Sunday, 5 February 2017

चंद्रगड - ढवळे घाट - महाबळेश्वर ऑर्थरसीट टोक

                                   सफर जावळीच्या खोऱयातील घाटवाटांची चंद्रगड ते ऑर्थरसीट


काही घाटवाटा पाहता क्षणी आपल्याला वेड लावून जातात आणि त्या सदैव आपल्याला स्मरणांत राहतात. चंद्रगड ते ऑर्थरसीट हा ट्रेक करावं हे प्रत्येक ट्रेकर्सच स्वप्न असत कारण हि तसंच जावळीच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या निर्सगरम्य परिसरातून भटकंती करणं. तसे पाहिले तर ऑर्थरसीट(ढवळ्या घाट) हा ट्रेक २ टप्यात पार करता येतो पहिला ढवळे गाव ते चंद्रगड, दुसरा चंद्रगड ते ऑर्थरसीट ट्रेकमधला हा सगळ्यात कठीण आणि स्टॅमिना कसाला लावणारा भाग कारण चंद्रगड ते ऑर्थरसीट दरम्यान ५ ते ६ तासाची सापळखिंडीतील दमवणूक करणारी वाटचाल शिवाय चंद्रगड वरून ऑर्थरसीट या दरम्यान बहिरीच्या घुमटी जवळ पाणी मिळते त्यामुळे ट्रेकर्स लोकांच्या शारीरिक क्षमतेची कस लावू पाहणारा हा ट्रेक..... चंद्रगड ते ऑर्थरसीट म्हणजेच ढवळ्या घाट हा जावळीचा प्रदेश, प्राचीन काळापासून महाड गावातून वाहणार्‍या सावत्री नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ढवळ्या घाट,सावित्री घाट, कुमठे घाट, दाभीळ घाट, आंबेनळी, पार घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. सावित्री नदीच्या (खाडीच्या) मुखावर असलेला बाणकोटचा किल्ला, घाटमार्गाचे रक्षण करणारा चंद्रगड, मंगळगड, प्रतापगड हे किल्ले. सध्याच्या ऑर्थरसीट म्हणजेच मढीमहालाजवळून एक घाटवाट थेट कोकणात उतरते याचं घाटाचे नाव ढवळे घाट.. हा ट्रेक एकट्या दुकट्या ने करण्यासारखा ट्रेक नाही पण काही केल्या कोणी तयार होईना मग विश्राम दादा बोलले जाऊ दोघेचं, बघू पुढचं पुढे. कोकणात जानेवारी ते मार्च नजदीक सर्वच गावात पालख्या आणि जत्रा असतात आमच्या गावातील जत्रा ४ फेब्रुवारीला असल्याने त्या निमित्ताने गावातील मंडळींनी ट्रॅव्हल बुक केली होती हि आलेली संधी आम्हांला सोडायची नव्हती. २ तारीखला गाडीच्या केबिनमध्ये बसून पोलादपूरच्या दिशेने निघालो मुंबई गोवा महामार्ग आणि त्यावर पडलेले विहिरी सदृश खड्डे हे काय कोकणातील माणसाला नवखे नाहीत. वाकण नंतर थोडा चांगला रस्ता चालू झाला आणि ड्रायव्हर दादा खूपच लयीमध्ये आले. गाडी नुसती ९०/१०० च्या आसपास सकाळी ४च्या सुमारास पोलादपूर स्टॅन्ड आम्हांला उतरवून धुरळा उडवत गाडी पुढे निघून गेली.
मुंबई गोवा हायवे 
पोलादपूर एसटी स्टॅन्ड टाईमटेबल 
पोलादपूर एसटी स्टॅन्ड मध्ये शुकशुकाट चार पाच कुत्री आणि २ म्हातारी माणसे, फेब्रुवारी महिना असला तरी हवेत गारवा होता. एसटी स्टॅन्ड मध्ये येऊन मस्त ताणून दिली सकाळी ६ च्या दरम्यान जाग आली. पाहतोतर कॉलेजला जाणारे पोर पोरी आमच्या अवतारकडे पाहून फिदीफिदी हसत होती लगेच स्टॅन्डच्या एकुलत्या एक पाण्याच्या नळाकडे धाव घेत फ्रेश होऊन स्टॅन्डच्या चौकशी खिडकीवर ढवळे एसटीची चौकशी केली असता काहीतरी वेडे हालचाली करत मास्तरांनी कानात ओरडल्यागत ७:१५ ची आहे सांगितलं. मग एका टपरीवर सकाळचा नास्टा आटपून परत येईपर्यंत ढवळे गावाची एसटी लागली होती. एसटी मध्ये तिकीट काढून मस्त ताणून दिली ती झोप उडाली उमरठ ते ढवळे रस्त्यावरील खड्यामुळे दोन वेळा चांगलाच खिडकीवर आपटलो. सकाळी ९ च्या दरम्यान ढवळे गावात पहिलं पाऊल टाकलं एका दादाला ऑर्थरसीटला जायचं आहे एवढंच विचारलं तर त्याने एखाद्या हॉटेल मध्ये बसून रेट कार्ड वाचावं तसं त्याने रेट सांगितले. फक्त चंद्रगड करायचा असेल तर दोघांना १०००/- रुपये आणि ऑर्थरसीट करायचा तर २०००/- गावातील बहुतेक जण कमी जास्त बिदागी सांगत होते वाटाड्याचीच बिदागी एवढी असल्यामुळे हा ट्रेक करावा कि नको हे भलतेच प्रश्न डोक्यात भणभणू लागले. विश्राम पुढे होऊन फक्त दोन प्रश्न त्या दादाला विचारले पहिला प्रश्न परतीची एसटी कितीची आणि दुसरा वाटेत पाणी कुठे भेटेल या दोन प्रश्नांची उत्तरे घेऊन विश्राम चंद्रगडच्या वाटेला लागला. त्याला काहीही ना बोलता मी ही त्याच्या मागून चालून लागलो ढवळे गाव सोडून आम्ही कोळीवाड्यातील वस्ती जवळ आलो

कोळीवाड्याकडे जाताना 
चंद्रगड 
एका ताईला चंद्रगडची वाट विचारून उजवीकडील डुक्करसोडेच्या डोंगराच्या वाटेला लागलो. आमच्या दोघांकडे प्रत्येकी ३ लिटर पाणी असल्याने आम्ही बिनदास्त पुढच्या वाटेला लागलो तसं पाहीलंतर ढवळे गावातून चंद्रगड स्पस्ट दिसत नाही पण कोळीवाड्यातून स्पस्ट दिसतो. वाट आता हळू हळू उभ्या चढणीची झाली चंद्रगड आणि त्याच्या बाजूला असलेल्या डुक्करसोंडीचा डोंगर यांच्या खिंडीत आलो समोर चंद्रगड हरहर महादेव पाटी दिसली.
चंद्रगड आणि डुक्करसोडीच्या मधील खिंड 
चंद्रगड हर हर महादेव 
५/१० मिनिटांच्या छोटा ब्रेक घेऊन चंद्रगडाच्या उभ्या चढणीच्या वाटेला भिडलो खरं पण हा उभा चढ कस काढू पाहणारा तरी हार न मानता चंद्रगड टॉप गाठला तो हि ५० मिनिटात एव्हाना घड्याळात सकाळचे १०.३० वाजले होते. थोड़ा आराम करून जावळीचा गार वारा पिऊन चंद्रगडची भटकंतीला निघालो.
चंद्रगड उभ्या चढणीचा पहिला टप्पा
चंद्रगड कातळटप्पा 
वाचनात आल्याप्रमाणे गडावरील एक एक अवशेष बारीकीने पाहू लागलो. चंद्रगडाचा आकार निमुळता आणि गडाच्या माथ्याचे दोन टप्पे आहेत एखादा बैल बसला असावा तसाच काहीसा वाटतो. पहिल्या टप्प्यात कोरीव नंदी आणि शिवपिंड दिसली
शिवपिंड आणि नंदी 

 डावीकडे कातळात एक कोरीव टाके दिसते पण तिथं पर्यंत पोहचू शकत नाही पुढे वाट सर्वोच्य माथ्यावर येते इथून जावळीचा मुलुख दिसतो इथे किल्लेदाराच्या वाड्याचे आणि ईतर घरांचे भग्न अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या पाच पाण्याची टांकी दिसतात अशी बरीचशी टांकी चंद्रगडावर खोदलेली आहेत.
जावळीच खोर


गडावरील सर्व अवशेष पाहून गड उतरण्यास सुरवात केली तेव्हा घड्याळात ११.२० वाजले होते विश्राम चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता दिसत होती मी लागलीच त्याला विचारलं काय झालं तेव्हा त्याने सांगितलं कि जेव्हा तो कोळीवाडयातील ताईला पुढील वाट विचारायला गेला तेव्हा त्या ताईंनी सांगितलं होत चंद्रगडाचा माथ्याजवळचा कातळकडा उतरला की डावीकडे पूर्वेला एक निमुळती पायवाट जाते हि एका खिडीतून खाली उतरून ढवळ्या घाटाच्या वाटेला भेटते याच वाटेवर एक आडवं झाड आहे तिथे आग्यामाश्याचं मोहोळ आहे तेव्हा तिथून सांभाळून पटकन काढता पाय घ्या. पटापट चंद्रगडचा माथा सोडून कातळटप्पा आरामात पार केला आणि खिडीच्या दिशेने निघालो यावेळी आमच्या चालीत बराचसा वेग होता कारण हि तसंच डाव्या अंगाला असलेलं ते आग्यामाश्याचं मोहोळ झाड ते पार करून १० ते १५ मिनिटात खिंडीत आलो. 

चंद्रगडच्या त्या खिडीतून खाली उतरलो आणि डावीकडून उजवीकडे ओढ्याला समांतर ढवळे घाटाच्या मळलेल्या वाटेला लागलो तेव्हा दुपारचे १२ वाजले होते. आमच्या दोघांकडे पाणी मुबलक प्रमाणात होत शिवाय वाटही सुरेख मळलेली त्यामुळे पुढची चाल आम्ही आरामात करत होतो शिवाय दुपारचे १२ वाजले असले तरी उन्हाचा त्रास असा जाणवत नव्हता कारण हि तसेच जावळीच भरगच्च भरलेलं जंगल... 
वाटेवर लागलेल्या काही खाणाखुणा 


 एक दिढ तासाची चाल झाली पोटात कावळे ओरडू लागले होते पण चढ काही होई संपेना दरीच्या उजव्या हाताने ही वाट सतत वर चढत एका नळीपाशी येते पायावर ताण येऊ लागला होता पण विश्राम काहीकेल्या ऐकत नव्हता. एव्हाना सापळखिंडीपाशी आलो सापळखिंडीतुन दूरवर चंद्रगडचे दर्शन झाले इथून एक वाट सावित्री खोऱ्यातील करंजे-दाभीळ गावांकडे जाते. 
 सापळखिंडीतून दिसणारा चंद्रगड 
सापळखिंड हि तीन अर्धवर्तुळाकार कड्याच्या छाताडावरून ट्रॅव्हर्स जाणारी वाट हि घसरडी, निसरडी ट्रॅव्हर्सी वाट हि जीव मुठीत घेऊन पार केली इथून वाट वर चढते आता छातीचा भाता जोरजोरात वाजत होता. शेवटी एकदाच बहिरीच्या ठाण्यापाशी पोचलो तेव्हा दुपारचे २:३० वाजले होते.
सापळखिंड पार करून बहिरीच्या घुमटीच्या आधी शेवटचा घसरणीचा टप्पा 
 बहिरीची घुमटी 
चला म्हणजे अर्धी लढाई जिकली म्हणावी लागेल तर बहिरीच्या ठाण्यापासून दोन वाटा फुटल्या होत्या एक जोर गावाकडे जाणारी तर दुसरी सरळ चढून गाढवाच्या माळावरून ऑर्थरसीटला जाणारी बहिरीचं दर्शन घेऊन टांक्यापाशी आलो. घरून आणलेली शिदोरी सोडली मस्त जेवण करून टाक्यातील थंडगार पाणी रिचवत १० मिनिटे आराम केला. दुपारचे ३ वाजले होते आणि तसेही पुढे ऑर्थरसीट वरून जुने महाबळेश्वर गाठून मुंबईच्या दिशेने जायचे होते त्यामुळे तिथून काढता पाय घेतला. सहयाद्री कुशीमध्ये कुठे मुक्काम करायचा असेल तर बहिरीच्या ठाण्यापाशी अशी आदर्श जागा शोधून सापडणार नाही. टाक्या जवळून खडी चढण चढून वर येतो तेच सहयाद्री अफाट नजारा डोळ्या समोर आला सावित्री नदीचे खोरे आणि त्यावर आकाशात घुसलेले सरळसोट कातळकडे वाह जबरी बेभान वारा खड्या चढणीने आलेला घाम त्या थंडगार वाऱयाने कुठल्या कुठे गायब झाला होता. ते दृश्य डोळ्यात साठवत पुढे निघालो वाट मध्येच कारवीत घुसायची तर कधी दरीच्या काठाने जायची तेव्हा दरीत उतरलेल्या डोंगरसोंडा मोठ्या मनमोहक दिसत होत्या.
 बहिरीच्या घुमटीचा उभा चढ चढून आल्यावर समोर ऑर्थरसीट पॉईंट 
सावित्री नदीचं खोरं 
बहिरीच्या घुमटीवरून तब्बल १ तासाची चाल करून ऑर्थरसीटच्या कातळटप्याला बिलगलो. तो टप्पा पार करून वर आलो तेच सूर्यास्त पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक लोकानी एकच गलका केला त्यात शाळेची लहान मुले तर प्रश्नांवर प्रश्न "दादा कुठून आलात" "कसे आलात" "खाली जंगलात वाघ वैगरे आहेत का" त्यांच्या प्रश्नांची उत्तर देता देता नाकी नऊ आले काय करणार चालायचं भावी पिढी आहे त्यांना सह्याद्रीची थोडीशी माहिती देऊन "तुम्ही मोठे झालात कि या सहयाद्रीच्या जंगलात फिरायला" असा समज काढून एका स्टॉल पाशी आलो.
ऑर्थरसीटवरून दिसणारा चंद्रगड आणि आजुबाजुंचा परिसर 


ताईंना मस्त गवती चहाची ऑर्डर देऊन थोडा फ्रेश झालो मस्त चहा पिऊन ताईंना जुन्या महाबळेश्वरला जायला काही वाहन भेटेल का याची चौकशी केली घड्याळात पाहिले तर दुपारचे ४:३० वाजले होते म्हणजे ट्रेक वेळेत झाला. विश्राम भलताच खुश होता बोलला चल चालत बघू काय भेटतंय का असे म्हणून जुन्या महाबळेश्वरच्या दिशेने चालू लागलो डांबरी रस्त्यावरील चाल आता कंटाळवाणी वाटू लागली कसेतरी एलफिस्टन पॉईंट जवळ आलो तेच डांबरी रोडच काम चालू होत काम संपवून कामगार जुन्या महाबळेश्वरला जात होते. त्यांना सहज विचारलं तर लगेच त्यांनी आम्हांला ट्रॅक्टर मध्ये मागील बाजूस बसण्यास सांगितलं आतापर्यंत एवढी खडतर वाट चढून आलो तेव्हा जेवढी वाट लागली नाही तेवढी ट्रॅक्टरच्या मागील भागात बसून पाश्व भाग आपटून वाट लागली होती ती सांगायला नको.
ट्रॅक्टर मधून जुन्या महाबळेश्वर जाताना 



 लगेच महाबळेश्वरचे दर्शन घेऊन ऑर्थरसीटकडे जाणाऱ्या फाट्याजवळ आलो संध्याकाळी ५:१५ च्या दरम्यान एक ट्रॅक्स महाबळेश्वरला जात होती ती पकडून महाबळेश्वर एसटी स्टॅन्डला आलो. स्टॅन्डवर उतरताच समोर मुंबईला जाणारी ६:१५ ची महाबळेश्वर-मुंबई एसटी लागली होती वाह ट्रेक मध्ये असा योगयोग कमीच जुळून येतो. फक्त ट्रेक वेळेवर पूर्ण करता यावा या गोष्टीवर माझा जास्त भर असतो एसटी मध्ये बसलेले असताना विश्रामला सहज विचारलं तू वाटाड्या घेण्यास नकार का दिला त्यावर तो बोलला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बस एवढं बोलून झोपून गेला. मी आपला खिडकीतून दिवसभर केलेल्या तंगडतोडीचा पाठपुरावा करत बसलो आणि कधी झोपेच्या आहारी गेलो कळलंच नाही....