Monday, 29 October 2012

आहुपे घाट- निसणीची वाट- सिद्धगड-नारिवली घाट



                      आहुपे घाट- निसणीची वाट- सिद्धगड-नारिवली घाट

            खोपिवली- आहुपे घाट- आहुपे गाव- निसणीची वाट- साखरमाची- सिद्धगड- नारिवली
पाऊसात भटकंती तशी कमीच झाली तसा घरच्यांचा पण विरोध होताच पाऊस संपल्यावर कुठे जायचं तिथे जा असा घरच्यांचा नारा लागलेला असायचा जणू. नुकताच पाऊस होऊन गेला मग डोक्यात कुठेतरी भटकंती करायच्या विचाराने काहूर माजवलं होत कुठे कुठे जायचं ट्रेकला गडकिल्ले तर थोडे फार झाले होते. वाघजाई आणि सवाष्णी घाट ने जे वेड लावले त्यानुसार एखादी घाटवाट करायची असा माझा बेत होता. पण कोणती ते ठरत नव्हतं मग आनंद पाळंदे यांचं चढाई उतराई सह्याद्रीतील घाटाची पुस्तक चाळू लागलो. जबरदस्त घाटवाटा पण पाऊस जाऊन १० दिवस झाले असल्याने जंगलातील पायवाटा वर गवत माजून पायवाट दिसणार नाही मग एखादी चांगली मळलेली घाटवाट घेऊ झालं आहुपे घाटाचं नाव पुढे आलं. विश्रामला कॉल केला त्याचं मत होत किल्ला किंवा एखादा गड  करू पण माझं मन मानत नव्हतं शेवटी बोललो चल जाऊ गोरखगडला त्याने लगेच होकार दिला. हा ना म्हणता २७ तारखेला रात्री निघायचं बाईक ने जायचं ठरलं होत इतक्यात उदय ने बॉम्ब टाकला मी पण येतोय मग एसटी ने जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. शेवटी २७ ला रात्री कल्याण मग मुरबाड एसटी स्टॅन्ड गाठले तेव्हा १०:३० वाजले होते. गाडी ११ ची असल्याने थोडं खाऊन आम्ही स्टॅन्ड मध्ये पडीक मारली इतक्यात स्टॅन्ड मध्ये गोरखगडाला जाणारा २५/३० जणांचा ग्रुप आला. नुसती आरडा ओरड चालली होती बहुतेक पिकनिक छाप पोरंपोरीच होत्या. गाडी स्टॅन्ड ला लागली तसे आम्ही एसटी मध्ये घुसलो सहाजिक तो ग्रुप पण पाठून चढला. देहरी गाव येई पर्यंत त्यांनी कानांची पार वाट लावली. देहरी गाव आलं आम्ही गडावर जाता पायथ्या जवळील गोरखनाथ मंदिरामध्ये आराम करायचा आणि सकाळी गड आरामात करायचा निर्णय घेतला.
रात्रीची थंडी घालवण्यासाठी केलेली शेकोटी 
तो ३० जणांचा ग्रुप गडाच्या दिशेने निघून गेला आणि आम्ही मंदिरात मस्त ताणून दिली. सकाळचे :४५ ला विश्राम मधेच उठला आणि आम्हा दोघांना पण उठवलं अचानक मला बोलला "दिप्या गोरखगड तर आपण केला आहे दुसरा कोणता प्लॅन आहे का तिकडे जाऊ मी लागलीच हो आहे ना आहुपे घाट". मग काय फ्रेश होऊन सकाळी :१५ ला खोपिवली गावाकडे चाल चालू केली
देहरीतून खोपिवली गावाकडे
सकाळी ६च्या दरम्यान एक काका भेटले "पोरांनो कुठे चाललात गोरखगडला का" आम्ही "नाही काका आहुपे घाटला"  काका "वाट माहित आहे का चला दावतो"  बरं झालं काका भेटले नाहीतर एवढ्या सकाळी गावात चोर घुसलेत कि काय समजून चोप भेटायचा.


डावीकडे आहुपे घाट तर उजवीकडे गोरखगड आणि मछिंद्रगड
काकाच्या घरी चहा वैगरे घेऊन बाहेर निघेपर्यंत फटफटलं होत सूर्याची कोवळी किरणे आहुपे घाटाच्या माथ्यावर झळकली होती. काकांनी योग्य त्या वाटेला लावून दिलं आणि माघारी निघून गेले गावाच्या बाहेर ओढा ओलांडून मस्त थंडगार पाणी पिऊन पुढे चढाई चालू केली
ओढा पार करून वाट दाट जंगलात घुसते

  येथील पाण्याची चव बिसलेरी पण नाही 
आम्ही जंगलात घुसत असताना भीमाशंकर अभयारण्याची पाटी दिसलीपाटी पाहून जरा चरकलोच इथे बिबट्याचा वावर आहे  पटकन वाटेला लागलो जंगलात घुसतो तेच एक ससा उड्या मारत उजवीकडून डावीकडे गेला. आहुपे  घाटवाटेचे सुरवातीलाच एक मानवनिर्मित टाकं लागलं होत
आहुपेघाट ओढा पार करून आल्यावर 

 दोघे सोबती विश्राम आणि उदय 
 मानवनिर्मित टाकं 
वाट मस्त मळलेली कुठेही फाटे फुटलेली सरळ सौम्य चढत जाणारी शांत जंगल आम्ही तिघेही त्या शांततेचा आनंद घेत मजल दरमजल  घाटाची उंची गाठत होतो.  वाट उजवे आडवे वळण घेत चढत जात होती साधारण अर्धी घाटवाट चढलो तेच उजवीकडे समोर गोरखडगड आणि मछिंद्रगडाचं दर्शन झालं.
मळलेली वाट


गोरखगड आणि मछिंद्रगड दर्शन 
इथेच थोडं खाली वाकून पाहिलं तर कातळात खोदलेल्या दोन टांकी दिसत होत्या ज्या घाटवाट चढत असतांना सहसा दिसत नाही पण वाट डावीकडे वळण घेत असतानां थोडं लक्ष दिल्यास त्या दिसतात. लगेच थोडं अंतर खाली उतरून टांकी जवळ आलो आजपर्यंत गडकिल्ल्यावर पाण्याची टांकी पाहिल्या होत्या पण घाटवाटांन मध्ये टाकी किंवा पायऱ्या पाहायची मज्जा वेगळीच
 कातळात खोदलेल्या टांकी 
खोपिवली गावातून वर येताना या टाक्या उजवीकडील बाजूस कोरलेल्या दिसतात
काही वेगळं पाहण्याचं सुख यालाच म्हणावं बहुतेक पाण्याची टांकी म्हणजेच ह्या घाटवाटेला खूप पूर्वी पासून महत्व असणार मनात असंख्य प्रश्न घेऊन पुढे वाटचाल करू लागलो. आता घाटमाथा जवळ येऊ लागला तसं थंडगार वाऱ्याच्या झुळका सुखवू लागल्या तब्बल तासाची चढाई करून घाटमाथा गाठला तेव्हा घड्याळात सकाळचे १० वाजले होते.
आहुपेघाट माथा

समोरील घळीतून आहुपे घाटाची वाट वर येते 


पोटात कावळे ओरडू लागले तसे आहुपे गावाकडे धाव घेतली आहुपे गाव तसं देखणंच मस्त फोटोग्राफी करून गावात आलो. साळवे काकाच्या घराजवळ आलो घरी खायला काही मिळेल का यांची विचारपूस करताच पहिला प्रश्न कुठून आलात पाव्हणं उत्तर मुंबई कडून आलो तसे काकांनी घरातचं बोलवून घेतलं. "तुम्ही मुंबईहून आलात एव्हड्या लांबून मग तुम्हांला उपाशी कसं जाऊ देऊ होय" असा बोलत असताना काकांनी सकाळची न्याहरीची भाकरी समोर केली. बोलतात ना गावाकडची माणसे साधीभोळी रसाळ मनाची त्याचा प्रत्येय आहुपे गावात आला होता

काका 
भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी वाह मस्तच प्रत्येकी भाकऱ्या पोटात ढकलून काकाना आम्ही गायदरा घाट सिद्धगड करून नारिवलीत उतरणार आहोत याची कल्पना दिली. काका बोलले "गायदरापेक्ष्या निसणीच्या वाटेने साखरमाचीत जा तिथून सिद्धगडवाडी मग नारिवली घाटाने नारिवलीत जा लवकर निघा" असे बोलताच आम्ही पटकन सर्व आवरत घेतलं निरोप देत असताना केलेल्या मदतीबद्दल मोबदला देण्यासाठी हात खिश्यात घालणार तेच काका ओरडले "तुम्ही आमचे पाव्हणं आणि पाव्हण्यांकडून कोणी कधी पैसे घेतो का" या शब्दांनी मला थोडं भरून आलं.

तरी विश्राम ने मागून जाऊन काकीच्या हातात पैसे ठेवून गपचूप आमच्या मागे चालू लागला मला थोड़ कसतरी वाटत होत. काकां आम्हांला वाट दाखवायला अर्ध्या वाटेपर्यंत येणार होते आहुपे गाव मागे ठेवून दमदम्याच्या डोंगराकडे वाट सरकू लागली आता मळलेला कच्चा रस्ता सोडून उजवीकडे चढणीच्या वाटेला लागलो वाट जंगलात घुसत होती.
दूरवर आहुपे गाव 


थोडे पुढे आलो तेच एक वाट डावीकडे तर एक सरळ जात होती काकांनी सांगितले अजून थोडे पुढे गेल्यावर अजून एक फाटा लागेल त्या फाटयापर्यंत दगडावर बाणाच्या खुणा आहेत डावीकडे जाणारी वाट दमदम्याच्या डोंगराला वळसा घालून येतोबा मंदिर करून गायदरा घाटाकडे जाते. इथे काका निरोप घेऊन परत गावाकडे निघाले पण माझं मन काही ऐकत नव्हतं मग विश्रामने सांगितलं काकींनी मदत केल्याबद्दल थोड फार मोबदला दिला तेव्हा मनाला शांती मिळाली

वाटेत एका ठिकाणी दिशादर्शक बाण दिसला 
 उजवीकडे गोरखगड 
आता समोरची वाट धरून सरळ चालू लागलो एव्हाना १२ वाजले होते मस्त आरामात त्या वाटेने दरी जवळ आलो सह्याद्रीचा बराच प्रदेश उलगडला सिद्धगड पासून ते पार नाणेघाट पर्यंत ते दृश्य पाहत कधी वेळ गेला माहीत पडलं नाही.


मग निसणीच्या वाटेकडे लागलो अबबब वाट पाहून डोळेच विस्फावले वाट अशी नाहीच फक्त पायांची वित राहील एवढीच क्षणभर वाटलं मागे जाऊन गायदरा ने उतरू पण खूप वेळ निघून गेला होता. शेवटी तेहतीस कोटी देवाचे नाव घेऊन निघालो एकदाचे वाट सरळ उतरणीची सतत आम्ही तिघे एकमेकांच्या डोक्यावर होतो
डावीकडे खाली साखरमाची गाव  

 निसणीच्या वाटेवर 
उदय तर पार ढुंगण टेकत खाली उतरत होता खाली डावीकडे साखरमाची गाव निपचित पडलेले होत एकाठिकाणी तर गवताने वाट अडवली मी ती पार करून पुढे जातो तोच पाठी उदय त्यावरून पाय घसरून थोडा खाली येणार पण वेळीच त्याने स्वतःला सावरलं

 मुरमाड माती त्यावर उगवलेले गवत अशी पायाखालील वाट 
मग काय जीव मुठीत घेऊन ती निसणीची वाट उतरून साखरमाची गावात आलो तेव्हा दुपारचे :३० वाजले होते वेळेचं गणित आता बिघडत होत. तसं आमच्या पायगाड्या जोरात पळू लागल्या साखरमाची मध्ये नेमकी / घर पण घरात कोण नव्हतं 
साखरमाची गावाकडे 
आमच्याकडे पाणी खूप असल्याने आम्ही सरळ सिद्धगडाकडे धाव घेतली. एका मागोमाग एक अश्या तीन पदरातील ट्रॅव्हर्स मारून गायदरा घाटाची वाट डावीकडे सोडून एका समाधी वजा जागेवर आलो जंगलातून थोडे बाहेर आलो तेच समोर एक छोटी घुमटी दिसली इथून पार वरती येतोबाच मंदिर आणि निसणीची वाट उतरलो असा नजारा समोर आलो
डावीकडील गायदरा घाटाची वाट समोर सिद्धगडकडे

छोटी घुमटी वजा समाधी
पुढच्या १० ते १५ मिनिटाला सिद्धगडाच्या दरवाजापाशी येऊन धडकलो तिथे जास्त वेळ काढता सिद्धगडच्या पायथ्याच्या मंदिरात आलो आणि मस्त ताणून दिली
 सिद्धगड दरवाजा 
विश्राम फोटो काढण्यात मग्न होता तर मी आणि उदय मस्त झोपलो होतो थोड्या वेळाने विश्राम उठवायला आला आम्ही दोघे त्यांच्यावर चिढलो. त्याने साताऱ्या भाषेत / शिव्या घातल्या आणि घड्याळात वाजले किती बघ बोलला तसं टुणकन उडून जागे झालो घड्याळात :४५ वाजले होते.
सिद्धगडाच्या  पायथ्यातील  मंदिर 

आजूबाजूला पडलेल्या शिळा आणि देवांच्या मुर्त्या 



  पटकन थोडं काही खाऊन नारिवलीची वाट धरली वाट कुठेही इकडे तिकडे फिरणारी तरी आम्ही घाई करत जेवढं अंतर कापता येईल तेव्हडं कापत होतो. शेवटी एकदाचे धापड पाड्याजवळ आलो तेव्हा :४५ वाजले मग धावतच :३० ला नारिवली गाठली
 नारिवली गावाकडील वाट

मागे सिद्धगड 
संध्याकाळची एसटी निघून गेल्यामुळे दुसरं कोणतंही साधन नव्हतं. आता तिघेही टेन्शन मध्ये आलो मुंबई कशी गाठायची इतक्यात एक माल नेणारा छोटा टेम्पो तिथे आला हात दाखवताच कुठे मुरबाड का आम्ही लगेच होकार कळवून गाडीत उड्या टाकल्या. मस्त ढुंगण दणदणत मुरबाड गाठलं तिथून कल्याण ला जाणारी एसटी जणू काही आम्ही वाटच बघत होती.
 नारिवली गाव 

नुसता दणदणाट 
एसटी मध्ये बसून बाहेर बघताना डोळा लागणार तेच विश्राम बोलला "दिप्या या पुढे फक्त घाटवाटा बरं का" मी मनात हसून फक्त हो बोललो आणि डोळे मिटताच डोळ्यासमोर सकाळ पासून केलेली तंगडतोड डोळ्या समोर उभी राहिली. कल्याणला येऊन मग विश्रामच्या घरी रात्री ११ ला पोचलो तेव्हा फक्त विश्रामला एवढंच बोललो आयुष्यात परत एकदा तरी आहुपे घाटाची वारी करायची.



(आजकालच्या ट्रेकिंग क्षेत्रात काही लोकांनी अपरिचित घाटवाटा किंवा निसणीच्या वाटाणा नवीन नाव देण्याचं फ्याड लागलं आहे. हि नावे गावकर्यांना पण माहित नाहीत त्यामुळे एखादा नवीन ट्रेकरची फसगत होऊ शकते म्हणून एखादी घाटवाट करत असाल तर त्याची योग्य ती माहिती घेऊनच करावी.आम्ही केलेल्या आहुपे ते साखरमाची निसणीच्या वाटेला काही लोकांनी धुळीचा घाट, तावली घाट अशी नावे दिली आहेत तेव्हा ट्रेकर्स लोकांनी योग्य ती माहिती जाणकारांकडून घेऊन मगच ठरवलेल्या घाटवाटांची भ्रमंती करावी.)


            


No comments:

Post a Comment