Monday, 10 February 2014

खुटेदार घाट- दुर्ग- ढाकोबा- दाऱ्या घाट


                        खुटेदार घाट-दुर्ग-ढाकोबा-दाऱ्या घाट 

सह्याद्री या नावातच काही वेगळंपण आहे रोजच्या दैनंदिन जीवनाला कंटाळुन कधी एकदा शनिवार रविवार येतो आणि कधी सह्याद्रीला भेट देतो असं वाटतखूप काही शिकायला भेटतं सहयाद्रीकडून कधी कधी कुठे चुकलो तर बापासारखा राग दाखवतो पण ते तात्पुरतंच म्हणावं लागेल मग आई सारखं प्रेम करत त्या चुकीवर फुंकर मारतो असा सहयाद्री तर आता मायबाप वाटतो.
 सहयाद्री मध्ये भटकंती करून खूप दिवस झाले होते कामाच्या निमित्ताने भटकंती कडे थोडं दूर लक्ष्य झालं म्हणलं तरी चालेल विश्राम दर शनिवार रविवार फोन करून विचारत असे दिप्या काही प्लॅन आहे का पण कामापायी मी नकार देत असे. मग एकेदिवशी सहज म्हणून कंप्युटर वर मॅप चाळत बसलो होतो मॅप बघता बघता नजर दोन अनगड किल्ल्यावर आणि तेथील घाटवाटांवर पडली. लगेच विश्राम ला फोन या रविवारी तयार रहा प्लॅन जबरी आहे खूप चालावं लागणार पण भावाने कसलीही पर्वा करता लागलीच होकार दिला. या वेळी घाटवाट होती खुटेदार आणि दारा घाट त्या बरोबर दुर्ग आणि ढाकोबा असा पायलट ट्रेक तोही एक दिवसाचा बरं का. तारखेला शनिवारी आम्ही सकाळी ५ला अंधेरी वरून निघालो मग कल्याण फाटा मुरबाड करून सरळगावला चहासाठी गाडी थांबवली तेव्हा घड्याळात ६:४५ वाजले होते ५ मिनिटे गाडीला आराम देत धसई मग रामपूरला ७:२५ ला उतरलो. गावातील राम दादाच्या घरी खुटेदार बद्दल माहिती विचारली दादा बोलले वाट सापडायची नाही इतक्यात एकनाथ दादा तिथे आले राम दादांनी एकनाथ दादांना आम्हांला खुटेदारच्या वाटेला लावून देयाला सांगितले. आम्ही तिघे वाटे कडे निघणार इतक्यात राम दादा बोलले "पोरांनॊ चहा घेऊन जा आणि गाडी इथेच ठेवून जा कुठे चुकलात तर आल्या पावली परत गावी या" असं सांगून आमचे दोघांचे नंबर घेतले आणि त्यांनी त्यांचा मोबाइल नंबर दिला. मस्त गवती चहा घेऊन आम्ही गाव उजवीकडे सोडत खुटेदारकडे चालू लागलो 
 खुटेदार घाटाकडे

त्रिगुणधारी घाट 
सकाळचे ८ वाजले तरी हवेत गारवा होता वाट आता शेतातून दाट जंगलात शिरू लागली. उजवीकडे त्रिगुणधारी घाट तसेच पोशीची नाळ आणि माडाची नाळ दर्शन देत होती वाट आता सरळ चढणीची होती पहिल्याच चढाला आम्हां दोघांना धाप लागली दादांनी एक सफेद साल गेलेलं झाड दाखवलं तिथून वाट उजवीकडे जाते असं सांगितलं तसेच पाणी जपून वापरा शेवट पर्यंत कुठेच पाणी नाही शिवाय मधी २/३ कातळटप्पे आहेत ते सांभाळून पार करा अशी माहिती पुरवून एकनाथ दादा माघारी निघाले. विश्राम ने केलेल्या मदती बद्दल मोबदला देण्याचा प्रयत्न केला पण दादा नि साफ नकार दिला तरीही विश्रामने मोबदला घेण्यास भाग पाडलंच. 
 इथून दादा परत निघाले 
त्या घनदाट जंगलात आम्ही फक्त दोघे बाकी निरव शांतता, ती शांतता कायम ठेवत आम्ही पुढे सरकत होतो. वाट आता कड्याला चिटकून जात होती पहिला कातळटप्पा लागला इथे गावकऱयांनी जाडजुड रोप बांधला होता हा सोपा कातळटप्पा पार करून पुढे निघालो परत चढणीची आणि घसरडी वाट त्यावर माजलेल्या गवतामुळे अजूनच घसरगुंडी होत होती. 
पहिला कातळटप्पा

सफेद साल सोललेल्या झाडाजवळून उजवीकडे वळायचं 

घसरडी वाट
वाट एका मोठ्या दगडाला बगल उजवीकडे वळुन दुसऱ्या कातळटप्प्याजवळ आली होती हा कातळटप्प्या थोड्या लीलया करून पार करून पुढे निघालो परत घसरडी वाट पार करून वाटेत एक ठिकाणी खुंट्या मारलेल्या दिसल्या कदाचित याचमुळे या घाटाला खुटेदार म्हणत असतील.

 दुसरा कातळटप्पा

वाटेवर मारलेल्या खुंट्या 

वाटेवर मारलेल्या खुंट्या 
एक एक टप्पा पार करून तिसऱ्या कातळटप्प्याजवळ आलो इथे पायऱ्या खोदलेल्या निर्दशनास आल्या या वरून हि घाटवाट नक्कीच पुरातन असणार फक्त उभी सरळसोट चढणीची असल्यानी त्यावेळी फार कमी लोक हि वाट वापरत असतील. आता पोटात कावळे चांगलेच ओरडू लागले होते सोबत आणलेलं सुखा मेवावर ताव मारला पाणी पिऊन पुढच्या चढाई ला लागलो एव्हाना घड्याळात ९:१५ वाजले होते. 
कातळात खोदलेल्या पायऱ्या   

 सफेद झाड दिसतंय का बघा
थंड हवेच्या झुळका मधेच येत असल्याने घाटमाथा आता जवळ वाटू लागला होता तरी अजून बरीच चढाई बाकी होती वाट उजवीकडे वळत एका ठिकाणी थोडा अवघड पण जुन्या जाणत्या ट्रेकर्ससाठी सोपा कातळटप्पा या टप्प्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. 
उजवीकडे तिरपे चालल्यावर कातळातील तिसरा कातळटप्प्याजवळ येतो  

तिसरा कातळटप्प्या आणि त्यातील पायऱ्या 

खुटेदार घाटमाथा
या वरून हि घाटवाट नक्कीच पुरातन असणार या वर मत ठाम झालं पुढील २/३ छोटे टप्पे पार करून बरोबर १० वाजता खुटेदारा घाटाचा माथा गाठला. आता सूर्य देव आपलं काम जोमाने बजावत असल्याने दुर्ग किल्ल्याकडे वाटचाल करू लागलो गर्द झाडीतून वाट जात मोकळ्या पठारावरून दुर्ग मंदिरापाशी आलो. 
खुटेदार घाटमाथा

 दुर्ग किल्ल्याकडे  
दुर्ग मंदिराचे बांधकाम चालू असल्याने बाजूला एक स्वच्छ पाण्यानी भरलेली कुत्रिम टाकी होती परत एकदा पोटात काही ढकलून दुर्गा देवीचं दर्शन घेऊन दुर्ग किल्ल्याकडे चालू लागलो किल्ल्यावर दगडाच्या सडा पडला होता ५ मिनिटांत खालील पठारावर आलो.
दुर्ग मंदिर

दुर्ग मंदिराचं जिणोध्दार

ढाकोबा आणि ओढ्यातील वाट 
ढाकोबाची पुसट वाट पकडत पुढे निघालो खरं पण मनात थोडी वाटेबद्दल रुखरुख होतीच. वाट खाली उतरत ओढ्याजवळ जात होती दुर्ग ढाकोबाच्या या प्रदेशात स्थानिक लोक आणि आपल्यासारखे वेडेचं फिरतात. वाट ओढ्याजवळून डावीकडूनच जात होती भयाण जंगल दुर्ग पासून अर्ध्या पाऊण तासांची चाल झाली होती मध्येच एक ठिकाणी  मागून कोणीतरी चालत येत आहे असं वाटलं मागे वळून बघतो तर भिवाडे गावातील मंडळी ढाकोबाच्या दर्शनासाठी जात होते आता मनाला लागलेली रुखरुख थांबली. त्यांच्याशी बोलता बोलता कळलं कि या विभागात शिकारीसाठी आजुबाजुंच्या गावातील लोक येतात सहाजिकच त्यामुळे ढाकोबाच्या वरील जंगलात असंख्य वाटा झाल्या आहेत कुठेही झाडीत न घुसता उघड्या माळावरून चाल करा असा जणू काही त्यांनी उपदेश देऊन ते एखादी वोल्वो एसटी ला ओव्हरटेक करून जाते तसे निघून गेले. आम्हांला जास्त घाई नव्हती त्यामुळे आम्ही आरामात चाल करत पुढे निघालो पुढील ५ ते १० मिनिटात ओढ्याच्या प्रवाहाने रांजण खळघे असलेल्या ठिकाणी आलो. 
ओढ्यातील रांजण खळगे 

दुर्ग किल्ला
पोटभर पाणी आणि सुखा खाऊन थोडा आराम केला घड्याळाचा काटा १ वर आला तसा तिथून पुढे निघालो आता वाट ओढ्याच्या उजवीकडून चढणीला लागली होती त्या दाट जंगलावरून मला वासोट्याची आठवण झाली भर उन्ह असताना हि इथे ऐसी मध्ये आल्यासारखं वाटत होत. वाट ओढ्यातून पार उजवीकडे वळत एका उजाड माळावर आली गावातील मंडीळीने सांगितल्याप्रमाणे त्या उजाड माळावरील डावीकडची वाट धरली आणि पुढील १० मिनिटात एक छोटासा जंगल टप्पा पार करून पुढे येताच तसे आम्ही खुश कारण ढाकोबाच्या मंदिराने दर्शन दिले. तसे मंदिर हि साध्या बांधणीतले मंदिरापाशी दीपमाळ, नंदी, दगडी रांजण असे पाहण्यासारखे खूप काही ढाकोबाच्या मंदिराजवळील परिसरात आहे. 
ढाकोबा मंदिर परिसर

ढाकोबा   
 स्वच्छ पाण्याने भरलेली विहिर
डावीकड़े स्वछ पाण्यानी भरलेली विहीर थोडे फ्रेश होऊन मंदिरापाशी परत येणार तेच आमच्या पुढे गेलेल्या गावकऱ्यांनी देवासाठी मस्त खिरीचा नेवैद्य बनवला होता त्यांनी आम्हांला हि नेवैद्य घेण्यास सांगितले. गावकर्यांनी दिलेल्या नेवैद्य वर मस्त ताव मारून थोडा आराम केला त्या शांत वार्तावरणात कधी डोळा लागला कळलंच नाही. 
खिरीचा नेवैद्य 
गावकरी परत जायला निघाले नशीब त्यांनी उठवलं पाहतो तर घड्याळात ३ वाजले होते लगेच सर्व आवरून दारा घाटाकडे निघालो असताना. आंबोली गावातील काका बोलले चला मी तिकडेच जातोय तुम्हांला वाटेला लावून देतो. मनात बोललो देव पावला चला म्हणजे पुढची वाट लवकर पार करता येईल वाट जंगलात न घुसता मोकळया पठारावरून जाते. पुढील वाट एका दरीच्या ठिकाणी आली इथून दोन वाटा फुटतात उजवीकडे आंबोली गावाकडे जाणारी तर दुसरी ढाकोबा किल्ल्यावर जाणारी दादांनी सांगितलं कि थोडं पुढे गेल्यावर एक वाट डावीकडे वळते ती ढाकोबा किल्यावर जाते तर दुसरी सरळ जाणारी दाऱ्याघाटाच्या खिंडीत लागलीच दादांना निरोप देऊन वाटेला लागलो.ढाकोबा किल्याची डावीकडील वाट सोडून सरळ वाट पकडली कारवीच्या जंगलातून बाहेर येतो तेच समोर सह्याद्रीचं अनोखं रूपच पाहायला भेटलं जणू नाणेघाट ते जीवधन वर डोक्यावर ढाकोबा पाठी आंबोली गाव खाली सिंगापूर पळू गाव एखाद्या चित्रकाराने जणू काही चित्रंच रेखाटलेलं जणू असं भासत होत.
आंबोली गाव   

दाऱ्या घाट

नाणेघाट जीवधन परिसर 
भन्नाट वारा पिऊन तिथून कसेतरी खाली दारा घाटाच्या खिंडीत आलो खिंडीत ३ वाटा आलेल्या पहिली जी आम्ही काही वेगवेगळ्या उचापाती करून ढाकोबा कडून आलो ती दुसरी आंबोली गावातून आली आणि तिसरी दऱ्या घाटाची या खिंडीत भैरव देवाचं ठाणं आहे. भैरव देवाच्या पुढ्यात माथा टेकून पुढील घाटवाटेला लागलो दऱ्या घाटाच्या बाबतीत लिहायचं झालं तर नाणेघाट सारखा राजमार्ग या घाटातून पूर्वी बैलगाडी किंवा जाड सामानाची ये जा या घाटवाटेवरून केली जात असे. 
भैरवदेवाचं ठाणं

कातळातील उजवीकडील वाट
 दाऱ्या घाट
उजव्या बाजूला असणाऱ्या कातळाच्या बेचक्यातून एक छोटीशी पायवाट खाली हळूहळू कोकणात उतरताना दिसत होती आम्ही तिच्याकडे वळलो हि वाट वळसा मारून खाली मोठं मोठ्याला शिळांन मध्ये आली. मग एक दगडावरून दुसऱ्या दगडांवर दुसया वरून तिसऱ्या असं करत त्या जंगलाची शांतात अनुभवत खाली उतरत होतो दाट रान, उंच पहाड, भर्राट रानवारा, पक्षांचा किलबिलाट यात आपण हरवून गेलो होतो या वाटांनाही काही एक अर्थ असतो, हे आपल्याला इथं जाणवून जातं. बरीचशी उतराई केल्यानंतर दगडावरून उड्या मारून विश्रामच्या पाय हळूहळू लागले मग एक झऱ्याजवळ छोटा ब्रेक घेऊन पुढे निघालो तेव्हा ५:३० वाजले होते. 
मोठमोठाल्या शिळा

  दाऱ्या घाट

दाऱ्या घाटातील झरा  
पळू गावाकडील वाट पकडून गावात आलो आम्हांला रामपूर जाण्यासाठी काही वाहन भेटेल का याची चौकशी करत असताना एक बाईकवाला दादा धसई ला जात होता लागलीच त्यांच्या बाईक वर ट्रिपल सीट बसून २० मिनिटात धसई गाठले. त्या दादानेच रामपूर मध्ये जाणाऱ्या दुसऱ्या बाईकवाल्या दादाला थांबवून विश्रामला रामपूरला सोडायला सांगतिले.  
पळू गावाकडे

दाऱ्या घाटाचे दर्शन 
मी धसई मधेच थांबून विश्राम वाट पाहू लागलो तब्बल १ तासाने साहेब आले आणि संध्याकाळी ८ ला घरच्या दिशेने बाईक सुसाट सोडली आम्हां दोघानांही वाटलं नव्हतं कि एकादिवसात आम्ही एवढी चाल करू शकतो वेळेवर भेटलेल्या गावकऱ्यांच्या मदतीमुळे हा ट्रेक पूर्ण झाला. 







No comments:

Post a Comment