Saturday, 25 January 2020

केट्स पॉईंट (नाखिंद टोक)- कमळगड- कोळेश्वर- जोर- बहिरीची घुमटी- ऑर्थरसीट (भाग-२)

                     केट्स पॉईंट (नाखिंद टोक)- कमळगड- कोळेश्वर- जोर- बहिरीची घुमटी- ऑर्थरसीट 

शुक्रवारी गाडीतील रात्रीची अर्धवट भेटलेली झोप आणि सकाळ पासून चालायचे श्रम यामुळे सर्व ट्रेक भिडूंना अंथरुणात पडताक्षणी झोप लागली. रात्री / च्या सुमारास थंडीचा जोर वाढला होता तो इतका कि टेंन्ट बाहेरून भिजून गेले होते. सकाळी :३० च्या सुमारास बाजूच्या घरातील कोंबडे काकाना उगाच जाग आली आणि साहेबांनी माझ्या झोपेचं पार खोबरं केलं मग अंथुरणातच इकडून तिकडून १० प्रदिक्षणा घातल्या तरी झोप काही येत नव्हती. 
शेवटी सकाळी :०० च्या सुमारास विश्राम ने सर्वाना उठवलं आम्ही चोघे (मी, विश्राम, राकेश, वैभव) जोर वरून बहिरीची घुमटी करून ऑर्थरसीट पॉईंटला ट्रेकची सांगता करणार होतो तर उरलेले तिघे भिडूं (सिद्धेश, अभि, स्वप्नील) हे गणेशदरा ने जुन्या महाबळेश्वर मध्ये येणार होते. त्यामुळे आम्ही चौघानी लगेच आवरत घेऊन फ्रेश होऊन सकपाळ काकांच्या घराच्या बाहेर येणार  तेच काका चहाचं ताट घेऊन समोर उभे काकांचे उपकार कसे फेडावे हेच कळत नव्हतं. बरं पैसे देण्यासाठी हात बॅगेत टाकणार तेच काकानी प्रेमळ शब्दांत खडसावलं असं करणार असाल तर पुढच्या वेळी माझ्या इथे तुम्हांला जागा नाही. काकाचे आभार मानून बाकीच्या भिडूंना गणेशदराची वाट समजावून गावातून बाहेर निघालो तर पूर्वेकडे सूर्यदेवांनी विविध रंगछटाची उधळण केलेली दिसत होती. गावातून पुढे निघताच कुंभळजाईच्या मंदिरापाशी देवीचं दर्शन घेऊन पुढे कृष्णा नदीवरील पुलावर आलो.
कुंभळजाई मंदिर

इथे मस्त फोटोग्राफी करत पुलाच्या उजवीकडील मार्किंग केलेल्या वाटेने पुढे निघालो वाट गर्द झाडीतून तर उतार चढाव करीत एका धनगरपाड्यापर्यंत वाट आली इथं पर्यंत मार्किंग चांगले आहेत इथून पुढे आपली वाट आपण शोधायची. धनगरपाड्यातील एका काकांना वाट कशी आहे याचा आढावा घेत पुढे निघालो.


धनगरवाड्याकडे जाणारी वाट 
धनगरवाड्यापुढे डावीकडील कातळात मानव निर्मित पाण्याची २ टांकी खोदलेली आहेत हे मला ठाऊक होते पण नेमके कुठे ते कळेना. विश्राम आणि वैभव पुढे चालत होते तर राकेश आणि मी मागेवाटेतील असंख्य उतार चढाव पार करीत कृष्णा नदीच्या उजव्या बाजूने वाटचाल करत असताना वाटेत एका ठिकाणी राकेशला रेंज आली म्हणून थांबला. त्याच्या बरोबर मी हि थांबलो घरी फोनाफोनी करून सर्व ठीक असल्याची खुशाली कळवली राकेश फोन वर बोलता बोलता थॊडा डावीकडे खालच्या कातळावर गेला तेच जोर जोराने हाक देऊ लागला. मी हि लागलीच तिकडे गेलो तर समोर कातळात खोदलेल्या पाण्याच्या टांक्या निर्दशनास आल्या ह्या पाण्याच्या टाक्या सहसा वाटेवरून निर्दशनास येत नाही राकेश ची हाक विश्रामला ऐकू आल्याने तो हि मागे आला.

कातळात खोदलेल्या टांकी 
पाण्याची टांकी पाहून नक्कीच हि वाट पुरातन असणार वाटेत अजून काही पाहायला सापडते का यासाठी आमच्या चौघांचे लक्ष्य वाटेच्या उजवी डावीकडे होते. वाट टाक्यापासून पुढे गर्द झाडीत घुसली आतापर्यंतच्या वाटचालीपासून २ ससे, १ भेकर असे वन्यप्राणी निर्दशनास आले होते. कृष्णा नदीच्या खोऱयातील एवढा थंडावा आतापर्यंत केलेल्या कुठल्याच भटकंती मध्ये मिळालेला नसावा त्या शांततेचा अनुभव घेत ओहोळावर ओहळ पार करत वाटचाल करत होतो. 
बहिरीच्या घुमटीकडे जाणारी वाट 
दाट जंगलातील वाट   

एव्हाना घड्याळात ९ वाजले वाट चढणीची होत जंगलातून मोकळं वनात आली डावीकडे बहिरीची घुमटी वाट तर एक वाट समोरच्या काट्याकुट्यातून क्रेस्टलाईन वर आली. समोर पाह्तोतर सहयाद्रीचा अफाट नजारा डोळ्यासमोर उभा राहिला डावीकडे चंद्रगड पासून ते पार अस्वलखिंड रायरेश्वर पर्यंत अशी मानमोडणारी द्रुश्य डोळ्यासमोर उभी राहिली. सह्याद्रीतील एक एक ठिकाण नजरे खालून घालत तेथून आल्या वाटेला परत आलो आणि बहिरीच्या घुमटीची वाट पकडली. 

ढवळ्या नदीचं खोरं 
आतापर्यंत शांततेत चालू असलेल्या भटकंतीला आता वाचा फुटली वैभव, राकेश प्रशांवर प्रश्नांचा भडीमार चालू केला. पुढील दिवसात प्लॅनवर प्लॅनची ह्या दोघांत जुंगलबंदी चालू झाली मी, विश्राम गालात हळूच हसत पुढील चढावाच्या वाटेला लागलो आता उन्ह चांगलीच तापली होती १५/२० मिनिटांच्या चढावानंतर बहिरीच्या घुमटीजवळ पोचलो. 
बहिरीची घुमटी   
भ्रमणमंडळ
पहिला पाडाव वेळेत पार केल्यामुळे राकेश आणि वैभवने एकच जल्लोष केला बहिरीच्या घुमटीच्या पाठीमागील द्रुश्य पाहून तर सर्वांचे भानच हरपले. सर्वाना सह्याद्रीची योग्य ती माहिती पुरवत पेटपुजा करण्यासाठी बसलो मग विषय निघाला ढवळे घाटचा प्राचीन काळापासून महाड गावातून वाहणार्‍या सावत्री नदीतून व्यापार चालत असे. जावळीच्या या खोऱ्यात बऱ्याच जुन्या घाटवाटा दडल्यात त्यात वरंधा घाट, वाघजाई, चिकणा, चोरखणा, कामथे(अस्वलखिंड), ढवळ्या, सावित्री, दाभीळ, आंबेनळी, रणतोंडी, पार, हातलोट अश्या एकापेक्षा एक सरस घाटवाटा आहेत. घाटावर जाणारा माल विविध घाटवाटांनी बाजारपेठेत जात असे, सध्याच्या ऑर्थरसीट म्हणजेच मढीमहालाजवळून एक घाटवाट थेट कोकणात उतरते याचं घाटाचे नाव ढवळे घाट.. माहिती देता देता १०:१५ कधी वाजले कळले सुद्धा नाही. बहिरीच्या ठाण्यापासून तीन वाटा फुटल्या होत्या एक जोर गावाकडे जाणारी तर दुसरी सरळ चढून गाढवाच्या माळावरून ऑर्थरसीटला जाणारी तर तिसरी खाली उतरणारी ढवळे गावात जाणारी, लागलीच बहिरीला नमस्कार करून निरोप घेतला आणि कातळात खोदलेल्या पायऱ्या पार करून पाण्याच्या टांकीजवळ आलो खाली बाटल्या पुन्हा भरून टांकी समोरील वाटेला लागलो. 
 ऑर्थरसीटच्या वाटेवर  
 कातळात खोदलेल्या पायऱ्या
 पाण्याचे टांके 
वाट आता खड्या चढणीची आणि घसाऱ्याची छातीवर येणारी त्यांत गचपण एवढं कि पहिला माणूस गेला त्या मागून दुसरा कोणी गेला कि पहिल्याकडून सुटलेल्या काट्याचा मार दुसऱ्याला लागायचा मग ठराविक अंतर ठेवून एका मागोमाग एक चालू लागलो आता छातीचे भाते जोरजॊराने वाजू लागले कसेतरी गाढवाच्या माळावर आलो. 


परत एकदा समोरील नजारा पाहून राकेश आणि वैभव खुश १० मिनिटांचा छोट्टासा ब्रेक घेऊन सुसाट भन्नाट वाहणारा वारा फुफुसात साठवताच सर्वाना वेगळीच संजीवनी मिळाली. आता सूर्यदेव शरीराची काहली करू पाहत होते गाढवाच्या माळावरून पुढील टप्यातील वाट मिश्र स्वरूपाची जंगल, उघडा रानमाळ आणि वळणावळणाची शिवाय काही ठिकाणी भुशभुशीत माती असल्याने थोडी काळजी घ्यावी लागते. 

हा टप्पा पार करून ऑर्थरसीटच्या शेवटच्या १५/१६ फूट कातळटप्प्यापाशी आलो तेव्हा घड्याळात दुपारचे १२:१५ वाजले होते तो कातळटप्पा सराईत पार करून आम्ही चौघे विंडो पॉईंटजवळ आलो. तसे ऑर्थरसीट पॉईंट वरून पिकनिकला आलेली मंडळी जोरजोरात ओरडून स्वागत करत होती शेवटची चढाई संपवून ऑर्थरसीटवर आल्याआल्या सर्वानी प्रश्नांचा भडीमार चालू केला. 

कसेतरी त्या गर्दी मधून वाट काढत पार्किंगजवळ आलो विश्राम पुढे जाऊन कोणी गाडीवाला किंवा एसटी वाले जुन्या महाबळेश्वरला सोडतील का याची चौकशी करायला गेला आणि नाकार्थी मान खाली घालत आमच्याजवळ आला. आम्हांला पुढे काय वाढवून ठेवलंय याची तशी कल्पना होतीच जवळील लिंबू स्टॉलवाल्या काकींना सरबताची ऑर्डर देऊन टेबलावर सॅक टेकवली सरबताचे ग्लासवर ग्लास रिचवत परत एकदा १० किलोमीटरच्या तंगडतोडीसाठी सज्ज झालो. 
 ऑर्थरसीट पॉईंट 
तंगडतोड 
आता डांबरी रस्त्यावरील १०किलोमीटरची चाल कंटाळवाणी वाटू लागली वाटेत येईल त्या गाडीला उगाच हात दाखवून थांबवण्याचा प्रयन्त करू लागलो. घड्याळात २वाजले होते मध्येच एक मळलेली वाट डावीकडे जाताना दिसली ती वाट धरून चालू लागलो आणि मज्जा बघा पुढील १० मिनिटांत जुन्या महाबळेश्वर मध्ये पोचलो. 
 महाबळेश्वर मंदिर  

आमचे तीन भिडू गणेशदरा चढून महाबळेश्वर वरून एसटी पकडून वाई मध्ये पोचले होते चला म्हणजे आमचं अर्धे टेन्शन कमी झाले होते. महाबळेश्वरचे दर्शन घेऊन जवळील एक हॉटेल मध्ये मस्त जेवून पुढील प्रवासाला लागलो जुन्या महाबळेश्वर मधून टमटम करून एसटी स्टॅन्डमध्ये येतो तीच संध्याकाळी ५ ची परळ एसटी समोर लागली होती. 
 लगेच एसटीमध्ये जागा अडवून परतीच्या प्रवासाला लागलो वैभव आणि राकेश पुढील ट्रेक ची आखणी करत होते रात्री १२:३० ला कुठे गाडीने दादर गाठले तेव्हा धावतच ट्रेन पकडून रात्री १:३०ला घर गाठले अंथुरणात डोकं टेकवलं तेव्हा २ दिवसांची तंगडतोड चित्रफिती सारखी डोळ्यासमोर तरळू लागली. 











Monday, 20 January 2020

केट्स पॉईंट (नाखिंद टोक)- कमळगड- कोळेश्वर- जोर- बहिरीची घुमटी- ऑर्थरसीट (भाग-१)


      केट्स पॉईंट (नाखिंद टोक)- कमळगडकोळेश्वरजोरबहिरीची घुमटीऑर्थरसीट

रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर ट्रेक झाल्यापासून जावळीच्या खोऱ्यात अजून एक दमदार कसदार ट्रेक करूया असा ध्यास माझ्या सवंगड्यानी घेतला होता जणू आणि त्यासाठी केट्स पॉईंट (नाखिंद टोक)- कमळगड- कोळेश्वर- जोर- बहिरीची घुमटी- ऑर्थरसीट असा तगडा प्लान हि बनवला. प्लान बनवून व्हाट्सअप ग्रुप वर टाकला त्यावेळी १४/१५ टाळकी होकार देऊन मोकळी झाली होती पण जस जसे दिवस जवळ येऊ लागले तस तसे आमचे हिरेमोती वेगवेगळी कारणे देऊन गळू लागले. मग शेवटी जणांचा ग्रुप फिक्स करून आणि ट्रेकच्या सामानाची जुळवाजुळव केली १७ जानेवारीला रात्री १०ला सानपाडा ब्रिज खाली जमण्यास सांगितले. सर्वाना जो ट्रेक करणार होतो त्या ट्रेक प्लानची योग्य ती माहिती जमा करायला सांगितली होतीच तसेच चाल मोठी आहे असे आधीच बजावले होते. तसे या प्लॅन मध्ये मी, विश्राम,राकेश या आधी या खोऱ्यात जाऊन आलो होतोच पण नवीन मित्रमंडळी असल्यामुळे माझ्याकडे अजुन बॅकअप प्लॅन तयार होतेच.

१७जानेवारीला सानपाडा सर्वाना एकत्र जमायला थोड़ा उशीर झालाच मग प्रत्येक गाडीच्या मागे पळता पळता हालत बेक्कार आणि इतक्यात महाबळेश्वरला जाणारी स्वामी ट्रॅव्हलची स्लीपर कोच समोर अवतरली वाह्ह आमचा रॉयल ट्रेक अजून रॉयल होणार कि काय असे मनात वाटले. कॉस्ट टू कॉस्ट ट्रेक या मतावर ठाम असल्यामुळे एजन्टशी थोडी घासाघाशी करून गाडीत जागा मिळवली. मग काय जो ट्रेक करणार होतो त्या ट्रेकची योग्य माहितीची देवाणघेवाण आणि गप्पागोष्टी करताना कधी निद्रादेवीच्या आधीन झालो कळलंच नाही. सकाळी :४५ ला राकेशने कानात दिलेल्या घोषणेमुळे खाड्कन उठून उभा राहिलो खिडकीतून पाहिलं तर गाडी पाचगणी पार करून मेटगुताड गावात आली होती तसं सर्वाना उठवून ड्रायव्हरच्या पुढ्यात आलो.
गाडी सकाळी :२० वाजता नाखिंद फाट्यावर सोडून पुढे निघून गेली गाडीतून पाय बाहेर ठेवताच थंडीने आम्हांला गाठलं. त्या गारठलेल्या अवस्थेत नाखिंद केट्स पॉईंटकडे / किलोमीटरची डांबरी रस्त्यावरील वॉर्मअप चाल चालू लागलो. केट्स पॉईंटला रमतगमत सकाळी वाजता पोचलो तेव्हा सूर्यदेव आपला आळस झटकून वर येताना दिसले आणि कमळगड ते कोळेश्वर असा अफाट नजारा डोळ्यासमोर आला. वाह्ह म्हणजे आपली चांगलीच वाट लागणार असे वाक्य नकळत राकेशच्या तोंडून  निघाले.
धोम धरण, कमळगड आणि पायथ्याला जिवा महाला यांचे जल्मस्थळ कोंढवळी गाव 
कातळकड्यातील पायऱ्या 
केट्स पॉईंट (नाखिंद टोकाच्या) वरून थोडे मागे येत रेलींगच्या डावीकडील कडयांतून बांधलेल्या पायर्यांच्या वाटेने खाली उतरतो तेच वाटेत अर्धे बुजलेले पाण्याचे टाके द्रुष्टीस पडले. टाक्यापासून थोडं पुढे सरळ गेल्यास कातळकड्यात एक गुहा दिसते ती पाहून आल्या वाटेने परत येऊन आम्ही खाली वायगाव कडे जाणारी वाट पकडून खाली उतरू लागलो. 
अर्धवट मातीने भरलेले पाण्याचे टाके
केट्स पॉईंटवरून उतराई 
हवेत गारवा असल्याने सर्वजण पटापट ती धारेवरील वाट पार करून वायगावात पोचलो तेव्हा सकाळचे ८:१५ वाजले होते कुठे काही खाण्यासाठी भेटते का याची चौकशी करत असताना गावातील काकांनी कानफाट्या हनुमानाचं मंदिराची माहिती पुरवली. अर्थात हनुमानाने दर्शन दिलेच पण पेटपूजा काही झाली नाही तसेच पुढे निघत कृष्णा नदीवरील पूल पार करून एका ठिकाणी घरून आणलेले अबरचबर खात बसलो. 
  वायगावकडील उतराई  



सर्व काही खाऊन झाल्यानंतर गावातील २मंडळीनी तुम्ही जिथे खायला बसले होते ते स्मशान आहे अशी माहिती पुरवली. आम्ही आपले काही न झाल्यासारखे खिदीखिदी हसत कमळगडाची वाट धरून चालू लागलो. परतवाडीच्या आधी नांदगणे गावातून एक वाट कमळगड आणि कोळेश्वरच्या खिडीत जाते असे गावकर्यांनी सांगितले सकाळचे ९:२० वाजले होते आणि सूर्यदेव आपले काम चोख बजावत असताना आम्ही परतवाडी मधील एकही झाड नसलेल्या सोंडेवरून न जाता नांदगाणे, फणसवाडीतून कमळगड-कोळेश्वर खिंडीच्या वाटेला लागलो. 
केट्स पॉईंट आणि धोम बलकवाडी धरण  

२०/२५ मिनिटांची खडी चढाई पार करतो तेच सर्वाना धापा लागू लागल्या सूर्यदेवांनी आपली कामगिरी चोख बजावण्यात कोणतेही कमतरता ठेवली नव्हती. कोळेश्वरच्या डावीकडील पोटात गोदावरी लेणं आहे अशी पुसटशी माहिती मी वाचली होती तसे काही आहे का ह्या माहितीला गावकऱ्यांकडून दुजोरा मिळाला होता वेळ भेटल्यास या ठिकाणाला भेट देणार होतो. छातीवरील चढाई पार करून एका झाडाखाली पाण्याचे घोट जिरवत बसलो असताना सहज मागे पाहिलं तर बलकवडी धरण आणि सकाळचा केट्स पॉईंट असा नजारा द्रुष्टीस पडत होता. परत एकदा बॅग पाठीवर चढवून पुढे निघालो आता वाटेला २फाटे फुटले होते डावीकडे पुसटशी वाट गोदावरी लेणेकडे जाणारी तर उजवीकडील कमळगड-कोळेश्वरच्या दिशेने एव्हाना घड्याळात १०:४५ वाजले होते गोदावरी लेणं डावलून पुढील वाटेला लागलो. 

कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात आता ७जणांच्या टीमचे दोन भाग झाले पहिल्या टीम मध्ये मी, विश्राम आणि वैभव तर दुसऱ्या टीम मध्ये राकेश, अभि, स्वप्नील आणि सिद्धेश दुसरी फळी खूपच हळू चालत असल्याने कोळेश्वर रद्द करावा लागतो कि काय असे एकेवेळी वाटू लागले. कसेतरी सर्वाना घेऊन कोळेश्वर-कमळगडच्या खिडीत आलो या पठाराला स्थानिक गावातील लोक सतीचा माळ म्हणून बोलतात. कमळगडच्या दिशेने चालताना एक वाट डावीकडे कोळेश्वरला जाताना दिसली तर सरळ जाणारी कमळगडला आम्ही सरळ जाणारी वाट पकडून १०मिनिटात भैरवनाथाचे मंदिर गाठले. २६ जानेवारीला वार्षिक सप्ताह असल्याने देऊळाचे रंगरंगोटीचे काम वासोळे गावातील काही मंडळी करत होती. 
भैरवनाथ मंदिर  
पाण्याचे टाके 
आम्ही आमच्या पाठपिशव्या मंदिराच्या इथे ठेवून कमळगडच्या धनगरवाड्याकडे निघालो वाटेत डावीकडे नेसर्गिक पाण्याचे टाके दिसले तसं वैभव या आधी कमळगडावर आला असल्याने कुठेही चुकण्याचा संभव नव्हता. टाक्यातील थंडगार पाणी पिऊन शरीरात तरतरी आली कुठे हि जास्त वेळ न काढता पुढील १० मिनिटात धनगरवाडा गाठला. धगरपाड्याजवळून उजवीकडील कमळगडच्या सर्वोच्य माथ्याकडील वाट पकडून १०/१५ मिनिटांची चढण चढून शिडीजवळ आलो. 
कमळगड धनगरपाडा आणि बक्कळ शेती 
कमळगड शिडी
कातळात कोरलेल्या पायऱ्या 
शिडी आणि कातळातील कोरीव पायऱ्या पार करून माथ्यावर येणार तेच समोर गेरूची विहीर वाह्ह याचसाठी केला होता अट्टाहास या भटकंतीचा. कमळगड करण्यामागे खास कारण कमळगडची माहिती काढत असताना नवीन माहिती हाती लागली होती. ती म्हणजे 'अफझलखानाचा वध' हा शिवप्रताप सर्वानाच माहित असेल त्यात महत्वाची भूमिका जिवा महाला यांनी बजावली होती, म्हणूनच आजही लोक "होता जिवा म्हणून वाचला शिवा" असे हि बोलतात. (जीव महाला यांचं जन्म कमळगडाच्या पायथ्यातील कोंढवली गावातील तसेच ते जातीने न्हावी होते त्यांचे मूळचे आडनाव सपकाळ. महाबळेश्वर, पाचगणी भागात न्हाव्याला आदरार्थी संबोधन 'महाला' असे वापरले जाते. अफजलखानाच्या वधाच्या वेळी पराक्रम गाजवला त्यामुळे ते आदरास प्राप्त ठरले. त्यामुळेच त्यांचा जिवा न्हावी उल्लेख न करता जिवा महाला असा होऊ लागला ज्यास्त माहितीसाठी प्रा डॉ सुरेश गायकवाड यांच्या कादंबरीचा फायदा आपण सर्वाना होईल). 
 गेरूची विहीर     

एव्हाना घड्याळात दुपारचे १२:१५ वाजले होते पोटात कावळे ओरडू लागले होते पण कमळगडावरून काही केल्या पाय निघेना शेवटी विश्रामने भानावर आणत कमळगडावरून काढता पाय घेतला. पटापट पाण्याच्या टाक्याजवळ येऊन परत एकदा ते अमृतुल्य पाणी पोटभर पिऊन मंदिराजवळ आलो पाठपिशव्या उचलून गावकऱ्यांकडून कोळेश्वरवर जाणाऱ्या वाटेचा आढावा घेतला. लागलीच सतीच्या माळावर आलो डावीकडे नांदगणे, बलकवाडी, फणसवाडी आणि उजवीकडील वासोळे गावाच्या वाटा सोडून सरळ कोळेश्वर जाणारी वाट पकडली पुढे १० मिनिटांच्या चालीवर उजवीकडे चांगली मळलेली माडगणीची वाट सोडून सरळ थोडी पुसटशी वाट पकडून कोळेश्वरची चढाई चालू केली. 

कोळेश्वरच्या वाटेवरून दिसणारा कमळगड 
आता पोटात काही नसल्याने पाय मागे रेटू लागले तरी सर्व एका मागोमाग गायीगुरे चालतात तसे चालत होतो. वाट कोळेश्वरच्या उजवीकडून जंगलात न घुसता मोकळं भागातून पुढे सरकत राहते पुढे अर्ध्या तासांच्या चालीवर कोळेश्वरची पहिली जंगम वस्ती लागली. 
पहिली वाडी 
दुसरी वाडी 
जंगम वस्ती जवळ पेटपूजा करून पुढे निघालो १५ मिनिटात दुसरी वस्ती लागली तिथे एका आजींना कोळेश्वरची वाट विचारून पुढे निघालो. कोळेश्वर जंगलातून चालताना असं वाटतं होत कि जसे काही अमेझॉनच्या जंगलातूनच चालत आहोत कि काय नुसती सर्व ठिकाणी हिरवळ सूर्य प्रकाश तर जमिनीवर पण पोचत नव्हता. घड्याळात दुपारचे २ वाजले असतील हेही कळले नाही एवढा थंडावा कोळेश्वरच्या जंगलात, आता वाट कधी अगदी गर्द झाडीतून, तर कधी पूर्ण मोकळ्या पठारावरून आणि वाढलेल्या झुडूपांतून जाणारी कारवीच्या रानातून वाट काढत आम्ही पुढे चाललो होतो. 

या डोंगराच्या डावीकडून गेलेली वाट जोरला उतरते तर सरळ जाणारी वाट कोळेश्वर  
आता परत एकदा २ फळया तयार झाल्या मी, विश्राम, वैभव पुढे तर बाकीचे सर्व मागे त्यामुळे चाल धीमी होऊ लागली. बहुतेक बाकीचे पहिले कधी रेंज ट्रेक न केल्यामुळे त्यांना थकावट आली असेल. आम्ही तिघे पुढे जाऊन दोन वाटा लागतात त्या फाट्यावर थांबलो यातील डावीकडे जोरकडील वाट एक दीड तासात जोर गावात जाते तर दुसरी सरळ दाट जंगलातून कोळेश्वरला जाणारी फाट्यावर अर्धा तास झोप घेतली तेव्हा कुठे हे चार जण अवतरले. आता परत पुढील वाटेला लागलो दाट जंगल असल्याने चुकामुक होऊ नये म्हणून एकत्र चालू लागलो एव्हाना घड्याळात ४:१५ वाजले होते. मधेच जोर गावच्या दुसऱ्या फाट्याला डावीकडे सोडून सरळ उजवीकडे जाणारी कोळेश्वरची वाट पकडून संध्याकाळी ५ च्या सुमारास कोळेश्वर मंदिरासमोर उभे ठाकलो. 


कोळेश्वर मंदिर आणि भ्रमणमंडळ 
वाह परत एकदा कोळेश्वर देव पण मनात बोलत असेल या पोरांनी मला नवस वगैरे तर केला नाहीना परत परत का येतात मला भेटायला असो. देवाचा आशीर्वाद घेऊन थोडी पेटपूजा करत परत एकदा सर्वानी पडीक मारली १५/२० मिनिटांच्या ब्रेक नंतर सर्वाचा मूड चांगलाच फ्रेश झालेला कोळेश्वरला निरोप देऊन जोर गावच्या वाटेला लागलो जिथे दोन फाटे फुटतात तिथे डावीकडील कमळगडची वाट सोडून (ज्या वाटेने आम्ही आलो ती) सरळ जाणारी जोर गावाची वाट पकडली १० मिनिटांच्या अंतरावर जाताच आम्ही वाट चुकतोय असा साक्षात्कार झाला. 
डावीकडे जाणारी वाट कमळगड आणि सरळ जोर गावाकडे 
परत मागे आलो १०/१५ मिनिटे वाट शोधण्यात वाया गेली इतक्यात कोळेश्वर जवळील धनगरपाड्यातील मामा गुरांना हाळी देताना दिसले. मामांना पुढील वाट विचारून योग्य त्या वाटेला लागलो संध्याकाळचे ६ वाजले होते अंधार होण्याच्या आधी जोर गावाच्या क्रेस्टलाइन वर आलो चला आता आरामात वाट उतरायची सूर्य अस्थाला जात होता आम्ही हळू हळू खाली उतरू लागलो. 
सूर्यास्त   
काळोखात जोर गावाकडील उतराई 
पण स्वप्नील आणि सिद्धेशच्या पायाला सूज आल्यामुळे थोडे जास्तच हळू चालत होते त्याच्या बरोबर राकेश, अभि असल्याने आम्ही तिघे जोर गावाकडे पटापट उतरू लागलो कारण हि तसेच विश्रामकडे रात्रीच्या जेवणाचे जिन्नस सामान होते गावात कुठे शिधा देऊन जेवण लवकर भेटले असते. तसे पाहिलं तर आमच्याकडे जेवण बनवायचे सर्व सामान होतेच पण एवढी चाल करून बाकीचे सर्व थकले होते त्यामुळे ते खाली उतरून फ्रेश होईपर्यंत जेवण तयार असेल आणि दुसऱ्या दिवशीसाठी फ्रेश राहतील. 
 नारायण सपकाळ काकांचे घर 
जोर गावात उतरून नारायण सपकाळ काकांच्या ओहरीत बसलो काकांनी लगेच ओळखलं गावातील माणसे ट्रेकर्स लोकांचे चेहरे कसे काय लक्षात ठेवतात देव जाणे लगेच पाणी आणून दिले आणि काकींना चहा चे फर्मान सोडले. बूट काढून २मिनटं पाठ टेकणार तेच चहा समोर हाजीर मानलं काकू आणि काकांना. घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे ७:३० वाजले होते गावातील पाण्याच्या टांकी वर जाऊन मस्त फ्रेश होऊन आलो मागचे चौघे अजून आले नाही म्हणून आम्ही तिघे बॅटरी आणि पाण्याची बॉटल घेऊन गावाच्या बाहेर निघणार तेच खालच्या रस्त्यावरून राकेशचा आवाज आला. चला हयांना शोधायला जायचे श्रम वाचले तसे राकेशला वाट माहित असल्याने काळजी नव्हतीच, सर्व एकत्र आल्यामुळे काकांच्या अंगणात एकच गोधंळ आवाज ऐकून आजूबाजूचे सुद्धा त्या गोधळात सामील झाले. 'कुठून, कसे,किती चालत आलात' 'काय काय पाहिलंत' वैगरे वैगरे प्रश्नांवर प्रश्न त्यांना उत्तरें देऊन बाकीच्या भिडूंना फ्रेश होण्यासाठी पाण्याच्या टांकी वर पाठवले. रात्री जेवणाचा खिचडी भात, सूपचा भन्नाट मेनू असल्याने कधी जेवणाच्या ताटावर बसतोय असं सर्वाना झालं होत त्यात थंडी आपले रंग आता दाखवण्यास सुरवात करत होती. रेडी टू ईट मन्चुरिअन व्हेज सूप गरमागरम पोटात गेल्यावर सर्वाना बरं वाटलं आता पाहता पाहता खिचिडीवर आडवा हात मारत तीही फस्त केली. 


रात्रीचे ९:३० वाजले होते थोडी शतपावली करण्यास बाहेर निघणार तर थंडीचा जोर वाढू लागला होता लागलीच काकांच्या वरच्या अंगणात टेन्ट टाकून झोपी जाण्याचा निर्णय सर्वानी न जुमानता अमलात आणला. सकाळपासूनची दमच्याक झाल्यामुळे बाकी भिडू झोपी गेले होते सिद्धेश आणि स्वप्नीलच्या पायाला सूज आल्यामुळे त्यांना अभि बरोबर गणेशदरा घाटवाटेने जुना महाबळेश्वर गाठण्यास सांगितले तर मी, वैभव, राकेश, विश्राम चौघे जोर बहिरीची घुमटी ते ऑर्थरसीट ह्या पुढील वाटेला दुसऱ्यादिवशी निघणार होतो.
















क्रमश