Monday, 27 November 2017

पाथरा घाट

                                        पाथरा घाट- कुमशेत- कात्राबाई खिंड- रतनगड- सामद्र 

अंधारबन घाटाची वाटचाल करत असताना विश्राम आणि रुप्या ने मला सहज एक प्रश्न विचारला. विश्राम आणि रुप्या एका सुरात "घाटवाटान मध्ये सर्वात कठीण आणि अवघड घाटवाटा कोणत्या" मी चालता चालता सहज वळून मागे पाहिलं तर त्यांचे चेहरे प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आतुरलेले होते. मी सहज बोलून गेलो अश्या घाटवाटा आहेत एक रायगड जवळील फडताड नाळ तर दुसरी आजोबागडाच्या खांदयावरील पाथरा घाट. झालं विश्राम पार ट्रेक संपेपर्यंत आपण पाथरा कधी करायचा हेच विचारत होता तर रुप्या पाथराच्या विचारात दंग झाला आणि शेवटी मला फक्त एवढाच बोलला "मला जमेल ना भावा" आणि मी हि फुल्ल फॉर्ममध्ये जमेल कि जमायला काय झालं. लगेच तारीख फिक्स पुढच्या रविवारी म्हणजेच २५ नोव्हेंबर. विश्राम बिनदास्त होता पण रूप्याच पुढे मागे होत होतं कारण हि तसेच होते आजोबागडाच्या खांद्यावरील अवघड आणि बिकट वाटेवर सहसा कोणी ट्रेकर जात नाही. काही मोजकीच डोकं फिरलेली टाळकी असले धाडसं करतात पण असले धाडस केल्याने आमच्या सारख्या वेड्यांच्या मनाला खूप शांती भेटते हे आमचं आम्हांलाच माहित 
पाथरा घाट
२५ तारीखजवळ येत होती तशी आमची ट्रेकची तयारी चालू झाली. ट्रेकचा प्लॅन नेहमी प्रमाणे माझ्याकडून ह्या दोन नमुन्यांनी बनवून घेतला होताच ठरल्याप्रमाणे २४ला आम्ही ठाणे स्टेशनला जमायचं ठरलं तसे आम्ही तिघेही वेळेत ठाणे स्टेशनवर जमलो वेळ रात्रीचे १०:३० वाजले होते. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या आम्हाला आसनगाव गाठून शहापूर एसटी डेपो ला जायचं होत आणि तेथून सकाळी पहिली एसटी पकडून डोलखांब किंवा साकुर्लीला पोचायचं होत. वेळेप्रमाणे आसनगाव लोकल आली थोडी खालीच होती त्यामुळे बसायला भेटलं परत एकदा पुढील ट्रेकच्या गप्पागोष्टी रंगल्या त्या इतक्या कि आसनगाव कधी आलं कळलं नाही आम्ही तिघे एकत्र असलो कि आमची दंगामस्ति खूप असते. रात्री १च्या सुमारास आम्ही ३भूत आसनगाव स्टेशन मधून शहापूरकडे जाण्यासाठी निघालो. शहापूर हायवेला येताच बाजूला पोलीसांची जीप येऊन उभी राहिली विनाकारण आमची चेकिंग करून पुढे निघून गेले जाऊदे ते त्यांचे काम होते असेही एवढ्या रात्री ३जण मोठ्या बॅग घेऊन हायवे वरून जाताना कोणाला हि शंका येईल आम्ही आमच्या धुंदीतच रात्री ला शहापूर एसटी डेपो गाठला. डोलखांब किंवा साकुर्लीसाठी सकाळची ७ची पहिली एसटी होती. त्यामुळे एसटी डेपो मध्ये मी आणि रूप्याने मस्त ताणून दिली विश्राम निद्राहीन असल्याने तो झोपला नव्हता. सकाळी जाग आली ती बोचऱ्या थंडीने आणि एसटी डेपो मध्ये झालेल्या कुत्र्यांच्या भांडणाने आजूबाजूला पाहिले तर जास्त कोणी माणसे दिसत नव्हती. इतक्यात विश्राम माझ्याजवळ आला बोलला डोलखांब आणि साकुर्ली ची एसटी लेट आहे पण पंढरीच्या पाड्यापर्यंत सकाळची ६वाजताची गाडी आहे. घड्याळात पाहिले तर :४५ वाजले होते. रुप्याला उठवलं आणि आम्ही तिघे फ्रेश होऊन मस्त गरमा गरम चहा घेतला. बरोबर ६ला पंढरीच्या पाड्याची एसटी स्टॅन्ड ला लागली. आम्ही गाडीमध्ये चढून परत एकदा मस्त ताणून दिली जाग आली ती सरळ पंढरीच्या पाड्याच्या स्टॉपजवळ पटापट एसटी मधून उतरलो. आता पुढे डोलखांबला जायला काही गाडी आहे का पाहू लागलो इतक्यात एक वडापवाला शाळेतील मुलांना सोडायला डोलखांबला जात होता कसेतरी कोंबून गाडीमध्ये बसलो आणि पाच ते दहा मिनिटात डोलखांबला पोचलो. परत एकदा चहाचा डोस घेऊन गुढे गावासाठी काही वाहन आहे कि नाही बघत असताना एक ऑटोवाले काकानी विचारले कुठे जाणार आम्ही लागलीच उत्तर दिले गुढे गावात ते बोलले मी तिथेच जात आहे चला तुम्हाला सोडतो रिक्षा मध्ये पहिल्याच मागे तीन सीट बसल्या होत्या  मग काय ड्राइवर काकाच्या उजव्या हाताला मी आणि डाव्या हाताला रूप्या विश्राम. विश्राम तर ऑटोबाहेर बसला होता त्यामुळे सकाळच्या गार वाऱ्याने पार गारठला. ऑटोवाले दादा खूप चांगले होते त्यानी गुढे गावाच्या पुढील वालशेत गावात सोडलं नुसतं सोडलं नाही तर पुढील वाटेची माहितीहि पुरविली.
वालशेत गावातून कोठाच्या वाडीकडे 


गावातील एक वयस्कर मामानी पुढे कोठाची वाडीला जा तिथे संतोष नांवाचा वाटाडया भेटेल तसे आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. त्या पक्क्या रस्त्यावरील चाल पार जीव घेत होती शेवटी एकदाचे पोचलो कोठाची वाडीला तेव्हा वेळ झाली होती सकाळचे ८वाजून ५०मिनिट गावातील कोणी घाटाच्या वाटेला लावून देईल का यासाठी थोडी विचारपूस केली. तसे संतोषदादा आणि बबन जाधव दादा तयार झाले आणि त्यांच्या मागून आमची पायगाडी चालू लागली
कोठाच्या वाडीकडून पाथरा घाटाकडे जाताना 
आजोबागड आणि सीतेचा पाळणा 
संतोष दादा एका झाडीभरल्या वाटेतून जात सहयाद्रीच्या पदरातील वाटेवरून वाटचाल चालू केली समोर सह्याद्रिचे अफाट दर्शन करून पार मान मोडत होती. दादाला चालता चालता विचारलं पाथरा कुठून चालू होतो दादांनी पार शेवटची एक सोड बोटांनी दाखवली तिथे जायचं आहे आपल्याला तशी आमची पावलं भराभर पडू लागली. मी बबन दादा आणि संतोष दादा पुढे होतो तर विश्राम आणि रूप्या मागे पडले होते.
वाटेत लागलेला ओढा 
शेवटी ओढे पार करून पाथराच्या सोडेंवर आलो दादांना त्यांची  मजुरी देऊन आम्ही निघालो. रुप्या थोडा दमला होता म्हणून थोडा आराम केला पण जास्त वेळ काढता तिथून लगेच निघालो. झाडीभरल्या सोंडेनेवर आलो आणि सह्याद्रीच्या पदराचं दर्शन झालं पाठी पाथरा घाट एकावर एक असे तीन टप्यात मांडी घालून बसला आणि शेवटी त्याचा अंगावर येणारा कातळटप्पा एव्हाना घड्याळात :३० वाजेल होते
 पहिला टप्पा 

 दुसरा टप्पा
पाथराचा दुसरा टप्पा चालू झाला हा टप्पा म्हणजे सुकलेल्या गवतावरून सरळसोट चाल एक पाऊल टाकलं कि २पावलं घसरून खाली येयाचं कसा तरी तो टप्पा पार केला आता सूर्य देव आपलं काम चोख बजावत होता. विश्राम ने लिमलेटच्या गोळ्या देऊन आम्हांला नवीन संजीवनी दिली होती पाथराच्या तिसऱ्या टप्प्यावर आलो होतो. 
 वाळलेलं गवतावरून चढाई 


या टप्यावरून घाटमाथा जवळ दिसतो खरा पण हा टप्पा पार आपला कस काढतो तो असा कि पायाखाली मुरमाळ माती येते आणि एकावर एक असे सलग आपण एकमेकांच्या डोक्यावर चाल करत असतो. आता पाय हुळहुळू लागले होते कधी घाटनदेवी येते असं वाटू लागलं
 तिसरा मुरमाड मातीवरचा टप्पा 
समोर कोठाची वाडी जिथून घाटवाटेची सुरवात केली होती 
मी पुढे माझ्या मागे रुप्या आणि शेवटी विश्राम अशी बैलगाडी मान खाली घालून ती सरळसोट चढाई पूर्ण करून घाटनदेवी पोचलो तसा रुप्याने सर्व देवांना नमस्कार करून लोटांगण घातलं. घाटनदेवी कुमशेत तसेच इत्तर गावकर्यांचे श्रद्धेचे ठिकाण देवीला वाहिलेली असंख्य मडकी, हिरवा चुडा आणि कातळाला फासलेला शेंदूर तसेच बाजूला कोरडे पडलेलं टाकं. 
घाटनदेवी असंख्य मडकी आणि कोरडं टाकं 
थोडा सुका खाऊ आणि पाणी पोटात टाकून पोटातील मेलेल्या कावळ्यांना जिवंत केलं घाटनदेवी वेळेत पोचलो होतो म्हणजेच ११ वाजले होते. आता पुढील वाट कस काढणारी तर होतीच पण तेव्हढीच बिकटहि वाटेचं निरीक्षण केलं तर घाटनदेवीच्या घळीतून आपण मुख्य कातळ वाटेवर येतो.
घाटनदेवीची खिंड 

पहिला कातळटप्पा 
येथून पहिला कातळ टप्पा सोपा पार करून दुसरा टप्पा थोडासा अवघड आहे त्यानंतर कातळातून अरुंद वाट सतत आपण परत एकदा एकमेकांच्या डोक्यावर असतो. शेवटी कधी एकदा घाटमाथा येतोय असं वाटतं वाटेच्या दोन्ही बाजूला दरी तोल जरा इकडे तिकडे झाला कि एक टप्पा मारून सरळ ४०० ते ५०० फूट दरीत अशी वाट स्वताचा जीव मुठीत घेऊन तसेच बाकीच्याना सांभाळत माथ्याच्या शेवटच्या कातळकड्यापाशी आलो
दुसऱ्या कातळटप्प्याजवळ 

 कातळात खोदलेल्या पायऱ्या 
आता उजवीकडे आडवी पण निमुळती वाट पकडून शेवटी एकदाचे घाटमाथ्यावर आलो. घाटमाथ्यावर येऊन वाटेचं निरीक्षण केलं आणि मनोमन त्या घाटवाट काढणाऱ्या व्यक्तीला दंडवत घातला. रुप्या ने थोडा आराम केला मी आणि विश्राम ती वाट नीट पाहत होतो. 
शेवटचा टप्पा

 वाट उजवीकडे वळते 
पाथरा घाटमाथा 
आता रुप्या परत एकदा सज्ज्य झाला होता कारण हि तसंच होतं कुमशेत गाठून कात्राबाई खिंड पार करून रतनगड गाठायचा होता आणि घड्याळात वाजले होते दुपारचे १२:४०. कुमशेतला जाणारी वाट पकडली थोडंसच अंतर पार केलं आणि एक ओढा लागला ओढ्याला बक्कळ पाणी होत बॅगेतील खाली बाटल्या भरून घेतल्या परत एकदा पाण्याची रसद भरून जरा बर वाटलं. 
कुमशेत कडे 
कुमशेतकडे पावलं पटापट पडून लागली आता रुप्याच्या चालीत वेग आला होता कारणही तसेच बिचार्याला जोरात भूक लागलेली होती. शेवटी एकदाचे मानवस्तीचे खाणाखुणा दिसू लागल्या शेतात काही गावकरी शेतीची कामे करत होती त्याच्याकडून गावाची योग्यती वाट समजून घेतली आणि वाटेला लागलो. वाटेवर असताना आमच्या विश्राम भाऊंना शॉर्टकट वाट दिसली हि वाट सरळ नदीच्या बाजूने जात होती आम्ही हीच वाट पकडून चालू लागलो खरं पण नदी पलीकडे जायचं कुठून हा प्रश्न सारखा पुढे येत होता शेवटी गावातील काही मंडळी पलीकडच्या बाजूला दिसली त्यांना विचारलं आणि दादांनी योग्य ती वाट दाखवली. दादाचे आभार मानून आम्ही गावाच्या वाटेला लागलो. 
समोर कुमशेतचा कोंबडा
 भर दुपारी ती वाट कंटाळवाणी वाटू लागली एव्हाना १:२० वाजले होते कुमशेतच्या ठाकूरवाडी मध्ये आमचं पहिलं पाऊल पडलं मग थोडं पुढे चालत आम्ही कुमशेत गावात पोचलो. आम्ही एका घरात जेवणाची सोय होईल का विचारलं तसं घर एकदम साधं पण घरातील माणसे मनाने मोठी त्या ताईचा हसरा चेहरा आज हि पाथरा घाटाचं नाव काढलं कि समोर येतो. त्या ताईनी लगेच तव्यावर आमच्यासाठी चपात्या आणि त्या बरोबर खाण्यासाठी शेंगदाणा मिरचीची चटणी दिली. अहाहाहा काय ती चटणी माझ्या कानातून पार धूर आला आणि नाकातून पाणी पण भारी मस्त वाटलं जेवण करायला आम्ही बाहेर पडवीतच बसलो होतो त्यामुळे समोरचा निसर्गाचा पॅनोरॉमा पहात एक एक घास खाली ढकलत होतो. 
 कुमशेत गाव 
आमचे लाडके रुप्या भाऊ भलतेच खुश होते त्याना वाटलं यापुढची चालहि तशीच असेल पण काय करणार पुढे त्यांचा भ्रमनिरास झाला. ताईना जेवण करायला थोडा उशीरच झाला होउदे आणि होयाचाच कारण आमच्या सारखी वेडी माणसे कधीही त्यांच्या दरवाज्यावर जाणार तर थोडी हॉटेल मधल्या बुफ्फेच सारखं जेवण आणून पुढ्यात भेटणार. जेवण करून थोड़ा आराम केला आणि डोळा कधी लागला समजला नाही ते उठलो ताईने दिलेल्या आवाजाने पाहतो तर दुपारचे ३ वाजले होते. आता सर्वांचीच चांगली तारांबळ उडाली आम्हाला कात्राबाई खिंड पार करून रतनगडला पोचायचं होत त्यात रुप्याने अजून एक बॉम्ब टाकला कि त्या विभागात बिबट्याचा वावर आहे. ताईंनी केलेल्या मदती बद्दल मोबदला देत होतो पण त्या घेत नव्हत्या. शेवटी कसतरी त्यांना ते घेण्यास भाग पाडले ताईकडून वाटेची नीट माहिती घेतली आणि आम्ही तेथून लगेच निघालो. आता दिवसभरचा थकवा त्यात भरपेट जेवण आणि झोप यामुळे पुढील वाट चढायला कंटाळा आला होता पण निसर्गाच्या वेगवेगळ्या लिलया पाहून ती सुस्ती कुठच्या कुठे पळून गेली होती. चित्रकाराणे काढलेले चित्रासारखे सर्व काही डोळ्यात समावत पुढे जात होतो. वाट पण मस्तच डावीकडे सर्व हिरवं हिरवं गार शेत आणि उजवीकडे कुमशेतचा कोंबडा तसेच मुंडा डोंगराची सोड दिसत होती. शेतात माणसे काम करता करता मधेच थांबून आमच्याकडे पाहायची तर काही आपुलकीने हाक देयायचे "कात्राबाई का" आम्हीही जोरात हाक देयायचो "हो दादा" करून आणि पुढे निघायचो. 

खिंडीतून कुमशेत गाव 
आता खिंडीच्या वाटेवर आलो वाट तशी रुळलेली आणि थोडी चढवाची होती. थोडंच अंतर चढलो उजवीकडून घळीतून येणारा ओढा कुमशेतच्या दिशेने वाहत होता ओढ्याला पाणी खूप होत थोडं फ्रेश होऊन पुढे निघालो रुप्या दादाची नुसती बडबड चालू होती. आता वाट कधी झाडीभरल्या रानातून जायची तर कधी उजवीकडे डोंगर ठेऊन कडेने जात वर चढायची. एका ठिकाणी वाट पार डावीकडे वळते आणि अंगावर येणारा चढ संपतो सरळ वाट लागते यावेळी उजवीकडे मुंडा डोंगराची रांग सतत आपल्या साथीला असते. पुढे परत एकदा चढ लागला आता पायातून पार गोळे येण्यास सुरवात झाली 


आम्ही तिघेही खूप थकलो होतो वाट पार कारवीच्या जंगलातून वर जात होती रुप्या दादा आता पार थकला होता तरी पण कसेतरी पाय ओढत चालत होता. शेवटी एकदाचे त्या झाडीभरल्या वाटेवरून वर आलो आणि समोरचा नजारा पाहून थक्कच झालो. अहाहा काय तो पॅनोरामा भारीच भंडारदरा धरण डावीकडे रतनगड त्याच्या मागे अलंग मदन कुलुंग किल्ले उजवीकडे कळसुबाई. सह्याद्रीचा तो नजारा आज हि डोळे बंद केले तरी डोळ्यासमोर समोर दिसते. बघता बघता कधी वेळ गेला माहीतच नाही लगेच कात्राबाईच्या मंदिराकडे डावीकडे वळलो. कात्राबाईच मंदिर फारच देखणं देवीच दर्शन घेऊन पुढे निघालो कुमशेत वरून आम्हांला खिंडीतुन वर येण्यासाठी १:३० तास लागला म्हणजे आम्ही ४:४५ ला मंदिराजवळ होतो.
दमलेला रुप्या 

कात्राबाई मंदिर  
तसं आमच्याकडे वेळ होता पण कुणास ठाऊक मनावर एक वेगळंच दडपण होत पण ते आम्ही एकमेकांन समोर आणत नव्हतो. आता रुप्या दादाची गाडी फुल्ल जोमात होती कसेही करून संध्याकाळी ६:१५ पर्यंत रतनगड गाठायचा होता. मी पुढे होतो त्यामुळे रुप्याने माझ्या हातात एक चांगली मजबूत काठी दिली तसे रुप्या आणि विश्रामकडे पण काठी होती. तसे आम्ही एकमेकांनमध्ये जास्त अंतर ठेवून चालत नव्हतो त्या दगड धोंड्याच्या वाटेवरून पटापट खाली पदरातल्या वाटेला आलो. आता कात्राबाईचे कातरलेले कडे पाहता मान मोडत होती. जंगलातील थंडी शरीरात घुसू पाहत होती पण आमच्या नॉनस्टॉप गाड्या गरम असल्याने एवढं काही वाटत नव्हतं. वाटेचं हि जास्त टेन्शन नव्हतं एकदम सुसाट आणि मोकळी मस्त मळलेली त्यामुळे शक्य तेवढं लवकर अंतर पार करत होतो. 

रुप्या आणि विश्राम फोटोग्राफीची मज्जा घेत मस्त चालत होते. अग्निबाण सुळक्या ने त्या घनदाट जंगलातून दर्शन दिले आता उजवीकडून एक वाट या वाटेला येऊन भेटली कात्राबाई खिंडीकडे जाण्यासाठी एक महत्त्वाचा फाटा रतनगड ते हरिश्चंद्रगड रेंज ट्रेक साठी लागतो. रतनगड वरून येणाऱ्या ट्रेकर्स लोकांनी उजवीकडे वळायचे. 
 रतनगड वरून कात्राबाई खिंडीत जाताना या फाट्यावर उजवीकडे वळणे 
रुप्या आणि विश्राम फोटो काढता थोडे मागे कधी राहिले हे मला माहित पडलं नाही तसं आमच्या तिघांन मध्ये जास्त अंतर नव्हतं. अचानक उजवीकडे खाली झाडीत कोणत्या तरी प्राण्यांची हालचाल झाली असे मला वाटले तेच तेच विचार करून मनात भ्रम झाला कि काय असे मला वाटलं. तेच पुढे दोन पावलं टाकतो तर उजवीकडील झाडीत परत गुरगुरण्याचा आवाज आणि हालचाल जाणवू लागली आता मी जागीच उभा राहून डोळ्यांत तेल घालून त्या झाडीत पाहू लागलो. थोड्या वेळासाठी अंगावर काटाच उभा राहिला आता जंगलातील थंडी मला चांगलीच जाणवू लागली. कान आणि डोळे सर्व लक्ष्य एकटवुन झाडीकडे पाहिलं इतक्यात हे दोन महारथी माझ्या जवळ पोचले. पार शेवटच्याक्षणी त्या जंगलातील त्या भावाची हलकीशी झलक पाहायला भेटली ती पण धूसर एकाक्षणी असा वाटलं कि तो मला पाहतोय आणि मी त्याला त्याच धसक्यात मी पुढे निघालो. आमची पायगाडी वेगाने रतनगडाकडे चालू लागली विश्रामला आणि रूप्याला सतर्क राहायला सांगितलं. अग्निबाण सुळका पार करून रतनगडाच्या हद्दीत आलो आता रतनगड डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होता 
रतनगड आणि खुट्टा 
उजवीकडे ओढयावर गावकरी मंडळी रान पार्टी करत होते आम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष्य दिले नाही. थोडे अंतर पार केले आणि डावीकडे उजवीकडे पाण्याची टाकी लागली आतापर्यंत तिथे पोचण्यासाठी आम्हाला ६ वाजले होते. 
 पाण्याची टांकी 
मग थोडं आरामात रतनगडाच्या खालील हरीशचंद्रगडाच्या फाट्यावर आलो तिथे जयराम दादाच्या टपरीवर मस्त लिंबू सरबतची ऑर्डर दिली आणि त्यांना जंगलात बिबटयाचा वावर असतो का विचारलं तुम्हांला भीती वाटत नाही का तर दादांनी छान उत्तर दिले "जर आपण त्यांना त्रास दिला नाही तर ते आपल्याला का त्रास देतील येतो कधी कधी इथे गावातील काही लोकांन समोरून गेला पण काही इजा केली नाही इथल्या जंगलात खाण्यासाठी खूप काही आहे त्यामुळे अजून तरी त्याने कोणावर हल्ला केला नाही" बस दादाच्या या उत्तरांनी माझ्या जीवात जीव आला. दादांनाच जेवणाची ऑर्डर दिली आणि आम्ही संध्याकाळचे ७ला गड चढायला सुरवात केली. 
हॉटेलजवळ 


अर्ध्या तासात आम्ही रतनगडाच्या तीन शिड्या चढून दरवाजापाशी आलो शनिवार असल्याने गडावर ट्रेकर्स लोकांची जत्रा जमली होती पण आम्हांला जास्त टेन्शन नव्हतं कारण दादांनी रत्ना देवीची गुहामध्ये झोपण्याची केली होती. पुढील गुहा आधीच फुल्ल झाली होती आम्ही फ्रेश होऊन थोडं सुखा मेवा खात मनसोक्त गप्पा मारत होतो त्यावेळी ह्या दोघांनी बिबट्याचा विषय काढला दोघांनाही पुढे काही धोका आहे थोडी चाहूल लागलीच होती मी एकटा पुढे आहे ह्याची जाणीव होताच दोघेही माझ्याजवळ पोचले. आता जयराम दादाची आतुरतेने वाट पाहू लागलो कारण भूक तशी लागली होती त्या आधी घरी जिवंत असल्याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी आमच्या परिवार म्हणजेच (गडवाट प्रवास सह्याद्रीचा) सांधण घळीत रॅपल्लिंगचा इव्हेंट होता तो हि कॉस्ट टू कॉस्ट त्यामुळे मग तर तिथे जाणे भागच होते. इतक्यात जयराम दादा जेवण घेऊन आले दादांनीच आम्हांला पाणी आणून दिले आणि सांगितले जर गावातील कोणी विचारलं तर सांगा कि जयराम दादांनी सांगितलं झोपायला म्हणून आम्ही नुसती मुंडी हलवून परत जेवणावर तुटून पडलो. त्या थंड वार्तावरणात गरम गरम जेवून मस्त ढेकर दिला तेव्हा ह्या दोन भावांची चेहेरे पाहण्यासारखे होते. 

थोडा वेळ गप्पा करून रात्री १०:३० ला गुहेत एका कोपऱ्यात मस्त ताणून दिली डोळे बंद केले तेव्हा दिवसभराची तंगडतोड डोळ्यासमोर नाचत होती सह्याद्रीचं एक वेगळं रूप आज जाणवतं होत. मध्यरात्री कोणी ट्रेकर आत येऊन जागा आहे का पाहून गेले पण आम्हाला उठायचं हि भान नव्हतं तसेच निपचित पडून राहिलो. सकाळीच सकाळी ६ला जाग आली ती पण बोचऱ्या थंडीने आम्ही लगेच सामानाची आवरा आवर करू लागलो कारण आम्हांला सकाळी ७:३०पर्यंत सामद्र गावात पोचायचे होते. फ्रेश होऊन मोठ्या गुंफेजवळ आलो तेव्हा चहाची सोय झाली होती लगेच चहा डोसून दरवाजाकडे निघालो आता सूर्य दादा आपली लीलया दाखवत होते. थोडी फोटोग्राफी करत पुढे निघालो


 रतनगडाच्या राणीच्या हुंड्या (भग्न बुरूज)जवळ काहीजण टायटॅनिक पोझ देत फोटोग्राफी करत होते असो नवीन आहेत चालायचे ते. पुढे पाण्याच्या टाकी जवळ काही ट्रेकर्स लोकांनी आपले बस्तान मांडलं होते वाटेवर कोकण दरवाजा,काही टाकी, गुहा पाहत पुढे निघालो. 



आता रुप्या दादा पुढे होते त्यांनी एक भलताच शॉर्टकट झाडीतून काढला तो नेढ्याच्या वाटेवर न जाता छातीभरल्या कारवीच्या झाडीतून जात होता कसेबसे त्रंबक दरवाजापाशी पोचलो दरवाजा पाहून भारावून गेलो सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर  रतनगडाला भेट द्या.
त्रंबक दरवाजा

त्रंबक दरवाजा


 एकावर एक कातळात कोरलेल्या पायऱ्या सांभाळून उतरत होतो पाठी वळून गडाच्या निर्मात्याला आणि वाट काढणाऱ्याला मनोमन वंदन करून पायऱ्या उतरू लागलो. रतनगडावरून खाली उतरल्यावर बाण सुळका आणि दरीच सुरेख दर्शन होत कातळमाथ्याच्या पोटातून आडवी वाट पुढे जात खुंट्या जवळून डावीकडे दरीत उतरत होती. खुट्टा आणि रतनगडच्या खिंडीत आलो इथेही गावकर्यांनी आता ४शिड्या लावल्या आहेत थोडी घसाऱ्याची वाट उतरून खुट्टा सुळक्याच्या डावीकडील वाट पकडली आता वाट सोपी आणि सरळ उताराची त्यामुळे चालताना जास्त त्रास जाणवला नाही. 



सामद्र गावाकडे 
मजल दरमजल थट्टा मस्करी करत सहयाद्रीच्या पदरात पोचलो कळलं सुद्धा नाही. सामद्र गावाची वाट पकडून चालू लागलो आमच्या गडवाट परिवाराच्या गाड्या आता दिसू लागल्या परिवारातील पोरांनी एकच गराडा घातला आणि प्रश्नांची सरबत्ती सोडली "कुठून आलात" "कसे आलात" "काय काय पाहिलं " "नेक्स्ट टाइम आम्ही पण येणार" आम्ही फक्त हो बोलत जवळच्या टपरीवर नास्टाची ऑर्डर दिली. 
सामद्र गावाकडे 
पाचच मिनिटात गरमा गरम मॅग्गी आमच्या पुढ्यात नास्टा करून लगेच तिथून निघालो सांधण घळीच्या रॅपल्लिंग स्पॉटजवळ पोचलो. आबा,सुबोध तसेच अजून जाणकार मंडळी उपस्थित होती. आबाने पुढे जायला सांगून एक एक सदस्यला नीट खाली उतरवायला सांगितले. सर्व सदस्य खाली उतरल्या नंतर मी आणि रूप्याने रॅपल्लिंगचा आनंद लुटला विश्राम भाऊ सर्वांचे फोटो आणि विडिओ काढण्यात मग्ग्न होता. 
 सांधण दरी 
सर्व सदस्यांना सामद्र गावात येऊन जेवण करायला दुपारचे ४:३० वाजले मग सर्वांचे आभार प्रदर्शन झाल्यावर संध्यकाळी ६:३० ला आम्ही आमच्या परिवाराच्या गाडीतून परतीचा प्रवास सुरु केला. मी ड्राइवर बरोबर केबिन मधेच गप्पा मारत बसलो पाठी विश्राम आणि रुप्प्या परिवारातील मुलांना पाथरा ते कात्राबाई मग रतनगड च्या गप्पा चालल्या होत्या. 

(पाथरा ते कात्राबाई, रतनगड चाल मग दुसऱ्या दिवशीचा सांधण घळीच्या रॅपल्लिंगचा थरार एक प्रकारचा बोनसच ठरला. चला मग कधी येताय आमच्या बरोबर भटकंती करायला.)